. प्रेरणादायी व्यक्तिमत्व - माझी आई. (1935-2017)


               आपण आजूबाजूला शोधायला जातो प्रेरणा पण आपल्याच घरात असलेल्या व्यक्तींची किंमत ती जिवंत असे पर्यंत नसते मात्र सोडून गेल्यावर वारंवार जाणवते. माझी आई पुर्वाश्रमीची सुशीला कुर्डेकर व लग्नानंतरची नंदिनी महाजन. कर्नाटक येथील  कारवार मधील एक छोटे गाव आंगडी येथे आईचे माहेर होते. आजोबा पोलीस खात्यात होते. आधीचे 7 भावंडे गेल्यानंतरचा 8 वा जीव म्हणजे आमची आई. त्यामूळे खुप लाड व कौतूक झाले पण हे सुख फार काळ लाभले नाही. वयाच्या 10 व्या वर्षी आईचे वडील वारल्यामूळे आजी 3 मुलांना घेऊन आंगडीला भावाकडे राहायला आली. मोठे कुटूंब व कायम माणसांचा राबता त्यामूळे शिक्षण, घरकाम, नेहमी इतराना मदत व नम्र स्वभाव त्यामूळे लवकरच सर्वांची लाडकी झाली. वयाच्या 16 वर्षी शाळेत ह्ळ्ळ्याल गावात शिक्षिका झाली. त्यामूळे आजी माझ्या आईला माझा मुलगा म्हणायची. 2 वर्ष नौकरी केल्यानंतर वयाच्या 18 व्या वर्षी श्रीपाद महाजन यांच्याशी लग्न झाले व सुशिलाची नंदिनी महाजन झाली.

           माझे वडील रेल्वेत असल्यामूळे नौकरी फिरतीची होती. एका छोट्या गावातून वेगवेगळ्या मोठ्या शहरात नौकरीच्या निमित्याने फिरणे सूरु झाले. यथावकाश 4 मुले झाली. आमला (मध्यप्र्देश), हैद्राबाद, निजामाबाद, नांदेड व वाशी असा तिच्या जीवनाचा प्रवास सुरू झाला. निजामबादला असताना शेंडेफळ म्हणजेच अस्मादिकाचे आगमन झाले. साधारण 70 वर्षापूर्वी कोणतीही साधने नसताना, अपु-या पगारात तिने आम्हाला कसे वाढविले असेल याची कल्पना आता मला आई झाल्यावर आली. शिका व आपआपल्या पायावर उभे रहा. स्व:ताशी प्रामाणिक रहा. आहे त्यात समाधान माना ही शिकवणूक न बोलता स्वता:च्या वर्तणूकीतून देणारी आई माझ्या साठी कधीही प्रेरणास्थान आहे. अबोल, साधीभोळी, सात्विक चेहरा असलेली माझी आई, सतत तीची काहीना काही कामे चालूच असायची. आमचे कपडे शिवणे, स्वेटर विणणे, स्वच्छता पाळणे, वेळच्यावेळी सगळी कामे करणे, सगळ्याना मदत करणे, कोणत्याही संकटांना न घाबरणारी सहनशील अशी व्यक्ती म्हणजे माझी आई. याचा मला अभिमान तर आहेच पण आज तिच्या बद्दल लिहून थोडीशी उतराई होईल असे वाटते.

                  आई म्हणजे गृहित धरणारी व्यक्ती असा अनेकांचा आजही समज आहे / असतो. तिच्या मनासारखे वागू नका पण निदान दुखऊ नका असे तिचे सांगणे असे. आमचा अभ्यास घेणे, प्रसंगानुरूप मार्गदर्शन करणे, माझ्या बरोबर बुध्दीबळ व पत्ते खेळणे, मधूर आवाजात सकाळी भूपाळी म्हणणे, रांगोळी काढणे, सडा घालणे इत्यादी नेहमीची कामे न चुकता करायची. वाचन, लेखन टिपण काढणे भरपूर आवडावयाचे. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद कसा शोधायचा हे मी तिच्याकडूनच शिकले. तिने केलेल्या संस्कारांमूळेच मी आज या जगात टिकून आहे. माझी आई सगळ्यांना तिच्या स्वभावामूळे आवडायची. वयाच्या 84 व्या वर्षी आठवणी मागे ठेऊन देवाघरी गेली.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव