अथांग सागर
नुकतीच “नारळी पोर्णिमा” झाली आणि सगळ्यांचे समुद्राबद्दलचे प्रेम उफाळून आले. माझा एक नाजूक कोपरा समुद्रासाठी राखीव आहे असे म्हणावयास हरकत नाही. कोणतेही समुद्र किना-यास भेट देणे मी सहसा चुकवत नाही. कारवार (कर्नाटक)मध्ये गेल्यावर “कारवारचा समुद्र” हा भेट देण्यासाठी एक अविभाज्य घटक असतो. विविध समुद्र किनारे आपआपला परिचय वेगवेगळा देत असतात. मुंबई, कारवार, गोवा, गणपतीपुळे, रत्नागिरी, अलिबाग, मुरूड, जंजीरा, गोकर्ण, दमण, गुजरात अशा अनेक समुद्र किना-यांचे दर्शन बघतच रहावेसे वाटते. विशेषत: सुर्योदय आणि सुर्यास्त पहाण्यासारखा असतो. त्यावेळी सगळा आसमंत एकदम शांत असतो. फक्त समुद्राची लाटांची गाज तेवढी ऐकू येत असते. ध्यान लागणे किंवा समाधी अवस्था प्राप्त होणे यालाच म्हणत असावेत. समूद्र किनारी फिरणे, लाटा पहात संध्याकाळ घालविणे, शिंपले गोळा करणे, वाळूचे किल्ले बनविणे, कुर्ल्यांच्या मागे धावणे इत्यादी अनेक उद्योग अनेकांचे चालूच असतात. कोकणवासी आणि कोळी बांधव यांना समुद्र आपला सखा वाटतो. त्याची पुजा करून ते नारळी पोर्णिमेच्या द...