खेळ आणि खेळाडूवृत्ती

           खेळ म्हटले की, अजूनही मनात आनंद पसरतो. प्रत्येक खेळ अगदी मैदानी असू दे, बैठे असू दे नाहीतर नव-नवीन मोबाईलवरचे खेळ असू दे.  प्रत्येकजण कोणत्याही वयात खेळण्यासाठी उत्सुक असतो, असे म्हणतात की, लहानपणी जो खेळतो तो पुढे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शक ठरतो.

             हल्ली खेळ हे पैसे कमविण्याचे साधन झाले आहे.  त्यासाठी लागणारी मेहनत, खिलाडूवृत्ती आणि संयम, हळूहळू कमीकमी होत चाललाय. ठराविक खेळाकडे लक्ष दिले जाते. प्रोत्साहन मिळते इतर खेळांना एखादे ऑलंपिक पदक मिळाले तरी दुर्लक्ष होते. कित्येकदा आपण वाचतो की निवृत्तीनंतरचे खेळाडूंचे हलाखीचे जीवन. खेळाच्या विकासासाठी आवड निर्माण होण्यासाठी लहानपणापासून प्रत्येक स्तरावर  म्हणजे शाळा, कॉलेज, गाव, तालुका, जिल्हास्तराव योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. या स्तरावर योग्य मार्गदर्शन, सुविधा, साहित्य, साधने याच्या पुरविठयासाठी ठराविक रक्कम मंजूर करण्यात आली पाहिजे. ठराविक वयानंतर निवृत्ती घ्यावी लागते त्यानंतर नौकरीसाठी किंवा मार्गदर्शक, प्रशासक होण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असते.

             सध्याच्या काळात दुर्दैव असे की, मैदान आणि मुलांचा ओढा कमी कमी होत आहे. त्यासाठी पालक आणि मुलांचे मन वळविणे आणि प्रोत्साहन मिळावे असे वातावरण निर्माण व्हावयास हवे. खेळाचे नियम असतात. तसेच काही बारकावे असतात. समोरच्या प्रतिस्पर्धाच्या चढाईवर आपण कशी मात करायची हे बाळकडू प्रत्येक खेळाचा भाग असला पाहिजे. असे असले तरच तो पुढील आयुष्यात यशस्वी होऊ शकतो.

             जीवनात तरी दुसरे काय करतो आपण? शेवटी परिस्थिती समजून घेऊन तिच्यावर मात करणे हेच तर करीत असतो. जिंकणे हा उद्देश असावा असे नाही.   खिलाडूवृत्तीची जोपासना करावी हे ही तेवढे महत्वाचे असते. खेळामूळे मानसिक तणाव दुर होतोच सोबत शरीर तंदुरूस्त रहाते. जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन मिळतो. हल्लीच्या दैंनंदिन कामकाजात आपण व्यस्त असतो तरी आपल्या आवडीचा कोणताही खेळ वेळात वेळ काढून  एकदा तरी आठवड्यातून खेळावा. आजुबाजूला मैदान किंवा गच्चीवर तरी का होईना स्वच्छ हवा आणि प्रसन्न वातावरण मनाला ताजेतवाने करण्यास मदत होईल.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव