सुरुवात आणि शेवट

             कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणे आपल्या हाती असते पण शेवट आपणच करू हे  जरी नक्की नसले तरी योग्य प्रयत्न करणे त्यासाठी योग्य -हेने मेहनत घेणे या गोष्टी आपल्या नक्की हातात असतात. आपण भाग्य, नशिब, नियती या गोष्टी प्रयत्नाने बदलू शकतो असा विश्वास आहे.

          उदय-अस्त, आरंभ-शेवट, मीलन-विरह, जन्म-मृत्यु, सकाळ-संध्याकाळ, डोंगर-दरी, काळा-पांढरा, सुख-दुःख असे अनेक शब्द विरुद्धार्थी असले तरी प्रत्यक्ष जीवनात जगण्याचे संदर्भ बदलून अपरिहार्यता दर्शवितात. आपण  एकाच गोष्टीची आस बाळगून असतो.खूप काही अपेक्षा जीवनाकडून, इतरांकडून ठेवत असतो. पूर्ण झाल्या नाही की निराश होतो. मनासारखे झाले तर खुश नाहीतर नाराजीचा सूर लागतो.

          आपल्या हातात जेवढे आहे त्यात समाधान मानावे हे कधी समजणार आपल्याला? कष्ट, मेहनत केल्याशिवाय काहीही मिळत नाही. यशस्वी झाल्यावर सगळेजण कौतुक करतात पण त्यासाठी लागणारी जिद्द, महत्वाकांक्षा, ध्येय गाठण्यासाठी लागणारा संयम चिकाटी आपल्याकडे आहे का? याचा विचार आपण करत नाही.

         ब-याच वेळा शोकांतिका होतात. काही प्रकल्प पुर्ण होत नाहीत म्हणून नाराज न होता पुन्हा प्रयत्न चालू ठेवावे लागतात. थोर शास्त्रज्ञ एडीसनला 100 प्रयत्नानंतर 101 वेळी बल्बचा शोध लागला. एडीसनने प्रयत्न सोडून दिला असता तर काय परिणाम झाले असते. काही वेळा चित्रपट, नाटक, प्रकल्प यशस्वी होतात तेव्हा त्याचे श्रेय अनेकांना मिळते पण अयशस्वी झाल्यास  कुणी पाठीशी नसते.

         असे म्हणतात, "आपल्या कर्माचा हिशोब" आपल्या खात्यात बरोबर जमा होत असतो. योग्यवेळी त्याचे फळही मिळते. फक्त तोपर्यंत आपली श्रध्दा आणि सबुरी कायम असावी. चांगली सुरुवात अर्धे काम झाल्यासारखे असते अशा अर्थाची म्हण आहे, ती योग्यच आहे. हेतू प्रामाणिक असेल तर नक्कीच काम पूर्ण होणार. काही कामे दीर्घकाळ चालू राहणार असतात, कोणतरी दुसरा येऊन पूर्ण करतो किंवा कधी कधी तर पिढ्यानपिढ्या चालू असते (अजंठा वेरूळ लेण्यांचे काम)  म्हणून चालूच ठेवले नसते तर!

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव