नैतिकतेस अनुसरुन
नैतिकता म्हणजे काय? असा प्रश्न कोणी विचारला तर एकदम पटकन आपल्याला उत्तर देता येत नाही. नैतिकता म्हणजे चांगले वर्तन, एखाद्या परिस्थितीत जसे दुस-यांने वागावे असे वाटते तसेच आपण वागावे. सौजन्य, पारदर्शकता, नम्रता, आपुलकीने दुस-यांशी वागणे व मदत करणे.
लहानपणी इसापनीती, चतूर बिरबल आणि तेनालीराम
यांच्या गोष्टी ऐकून मोठे झालेले आपण हळूहळू परिस्थितीनुसार शहाणे होत जातो. शाळेत नागरिकशास्त्र, मुल्यशिक्षण शिकून थोडीफार मुलांना कल्पना येते. मोठे झाल्यावर हे विषय किती अमंलात आणतात हा एक संशोधनाचा विषय आहे. पुढे व्यवहारी जगात परिस्थितीनुसार टक्के-टोणपे खाल्याशिवाय अक्कल येत नाही असे म्हणतात. पाण्यात पडले की पोहता येते असेही काही जण म्हणतात. परंतू पाण्याची खोली, आपली ताकद तरून जाण्याची जिद्द ही असल्याशिवाय कोणताही माणूस यशस्वी होऊ शकत नाही.
कसे वागावे, जगावे, रहावे हे आपण नकळत आपल्या घरातल्या मोठ्या माणसांकडून, आजुबाजूंच्या नातेवाईकांचे अनुकरण करीत असतो. पुढे मोठे झाल्यावर स्वत:चे मत, परिस्थिती, व्यवसाय, मिळकत, शिक्षण, रहाणीमान, संस्कार इत्यादीमूळे फरक पडत जातो. नैतिकता म्हणजे स्वयंशिस्त लागावी, कार्यपध्दतीचा योग्य वापर व्हावा आणि सर्वांना समान वागणूक मिळावी या हेतूने वागणे अपेक्षित असते. नियमांचे पालन करून संभाव्य धोके टाळावे हे ही अपेक्षित असते. दुस-यांना त्रास होवू नये म्हणून जी खबरदारी अपेक्षित असते ती ही एकप्रकारे नितीमत्ता म्हणता येईल. नम्रता, प्रामाणिकपणा, शिस्तपालन इत्यादि अनेक गुणांचा नितिमत्तेत समावेश असतो.
Comments
Post a Comment