आम्ही सावित्रीच्या लेकी
आज सावित्रीबाईंचा जन्मदिवस. शासकीय कार्यालयात नेहमी आम्ही गांधी, नेहरूंच्या बरोबरीने त्यांचा फोटो पाहतो तेव्हा आमचा ऊर अभिमानाने भरून येतो. त्यांनी रचलेल्या पायावर आजच्या स्त्रियांचे पाऊल अंतराळात झेपावले आहे. जगाच्या आकाशात महिलांचा झेंडा सर्वच क्षेत्रात उंचावत आहे ते शक्य झाले केवळ सावित्रीबाईंच्या योगदानामुळेच. स्वाभिमान आणि स्वत्व जपणे असे दुहेरी काम प्रत्येक स्त्रीला करावे लागते. मग ते घरात असो किंवा कामाच्या ठिकाणी. स्वत:बरोबरच इतरांना सांभाळून संसार व जीवन मार्गी लावणे हे प्रत्येक स्त्रीचे आद्यकर्तव्य ठरते.
आज स्त्रिया स्व:कर्तृत्वाने आणि स्वाभिमानाने प्रसंगी साथ असू दे, नसू दे त्या स्वतः खंबीर भूमिका घेत आहेत. अनेक स्त्रिया आपल्या अवतीभवती आढळतात, ज्या सार्वत्रिक प्रश्न आणि पडणारे पेच हे प्रयत्नाने सोडविणा-या आहेत. त्या अंधारात चाचपडणाऱ्यांना आशेचा किरण दाखवतात, प्रतिकूल परिस्थितीतही धैर्याने लढतात. निवडलेल्या क्षेत्राशी बांधिलकी जपणारी, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनही सुसह्य करण्यासाठी धडपडणारी अशा स्त्रियांची ओळख आपल्याला वारंवार घडत असते.
Comments
Post a Comment