.“नाही चिरा नाही पणती”

            मध्यंतरीगेले सांगायचे राहूनया विषयावर फेसबुकवर स्पर्धा आयोजित केली होती. घरातल्या सर्वात मोठ्या माणसाबद्दल किंवा कुटूंब प्रमूखाबद्दल आपण कधी सहसा उल्लेख करीत नाही. खरं तर तिथूनच त्यांचा वारसा आपल्या पर्यंत पोहचलेला असतो. काळाच्या ओघात सगळे विसरून जातो. म्हणूनच माझ्या आईची आई म्हणजे आजी आणि बाबांची मोठी बहिण या दोघांबद्दल ऋणनिर्देश म्हणून लिहावेसे वाटले. त्यासाठीचा हा थोडक्यात लेखन प्रपंच.

(1)  चिमणी आजी उर्फ श्रीमंतीबाई कुर्डेकर (सन 1912  ते  1998)

           पुर्वीची नावे गंमतीशीर असायची.  चिमणी आजी गोरीपान, लुकलुकणारे निळे डोळे असलेली, दिसायला आजी सुंदर होती. वारंवार होणा-या मुलांच्या अकाली मृत्यूने हैराण झालेली, नंतरची 3 अपत्ये जगली त्याचे समाधान मानेपर्यंत लहान असतानाच (वयाच्या 25 वर्षी) वैध्यव्याचा घाला पडला. सासर असूनही माहेरी राहणारी. चेहरा कायम निरागसपणे हसणारी मायाळू. अबोल पण सदैव काही ना काही कामात दंग असलेली गावाकडची माझी आजी. माझ्या वयाच्या 20 वर्षांपर्यंत आम्ही दरवर्षी गावी जायचो तेव्हा 8-10 दिवस तिचा सहवास मिळायचा. तिचे प्रेम आम्हाला वर्षभर पुरायचे. म्हातारपणातही सौंदर्य लपलेले नव्हते. मुलेही सुंदर होती पण तिच्या सौंदर्याला उपमा नव्हती. आता ते सौंदर्य थोडेफार मुलाच्या मुलीकडे आणि मुलीच्या नातीकडे वारसा म्हणून आलेले आहेत. फक्त निळे डोळे मात्र आलेले नाहीत. त्या निळ्या डोळ्यांची झाक वेगळीच होती.

           बोलके डोळे म्हणजे तेव्हा समजायचे नाही. आता कदाचित असे वाटते की तिला तिच्यावरच्या अन्यायावर दाद मागायची होती का? सौंदर्याला शाप हवाच का? तिन्ही मुले शिकली मोठी झाली पण एकटेपणाचे दु: कायम तिच्या सोबत राहीले. मानाने सासरी राहिली असती तर थोडी खंत कमी झाली असती का? तिला जिवाभावाचे असे कुणीच मिळाले नाही का? शेवटी शेवटी तर तिने 2 वर्ष डोळे मिटून घेतले.स्वाभिमान कायम जपणारी. “सांभाळून रावाअसे म्हणणारी माझी आजी माझ्या वयाच्या 32 पर्यंत आणि तिच्या वयाच्या 86 पर्यंत लाभली. 3 लहान मुलांना घेऊन माहेरी 15-20 जणांच्या एक एकत्र कुटूंबात कष्टाने वाढवून त्यांना संस्कार व शिक्षण दिले हे त्याकाळात मोठी बाब होती.  हसत हसत दु: पेलायचे असते” ही शिकवण कायमची देऊन गेली. तिला आमचे असंख्य प्रणाम !.

  (2) मोठी आत्यायशोदा डुबे (सन 1905 ते 1946)

        माझ्या वडीलांनी लहानपणी सांगितलेले मला थोडेफार स्मरणात राहिलेल्या आत्याबद्दलच्या काही गोष्टी मी लिहीत आहे.

         कारवार तालुक्याच्या एका खेड्यात वयाच्या 14 व्या वर्षीबालविधवा”, म्हणून माहेरी आल्यानंतर लगोलगच पाठचा भाऊ, आई-वडील यांचे झालेले मृत्यू. तिच्या पाठीमागे अजून 2 भाऊ 1 लहान बहीण, कमविण्यासाठी हाती काही नाही. त्यासाठी पुणे येथे हिंगण्याला जाऊन स्वत: नर्सींग शिकली. भावांना आणि बहिणीला पुण्याला विद्यार्थी गृहात ठे मोठे केले. पुढे भाऊ चांगले शिकून मोठे झाले. बहीणही चांगली शिकली. दोघा भावांचे संसार फुलले. हे बघायला आत्या जास्त जगली नाही. त्याकाळात बालविधवा झालेल्या स्त्रीने, भाऊ बहिणीची जबाबदारी घेऊन त्यांचे आयुष्य घडविणे सोपे नव्हते. आत्याने जिद्दीने केले म्हणून आजचे दिवस आम्हाला दिसले. आत्याने केलेल्या अविरत श्रमाचे फळ तिला बघायला मिळाले नाही.  वयाच्या 40व्या वर्षी अल्पशा आजाराने तिचे निधन झाले. यशोदा डुबे आत्याने जोपासलेल्या रोपट्यांचा आज महावृक्ष झालेले आहेत.

              आजी व आत्या या दोघींचे आमच्या सर्वांवर असलेले ऋण कधीच फेडणे शक्य नाही.

टिप: दर्शविलेला कालावधी अंदाजित आहे.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव