गा-हाणे

        नुकतेच गणपती येऊन गेले. शेवटच्या  दिवशी गणपतीला घरातील मोठी माणसे गा-हाणे घालतात. “जी काही सेवा केली ती गोड मानून घ्या आणि पुढच्या वर्षी लवकर या”  अशी सांगणी करुनच मग गणपती जागेवरुन हलविला जातो. ही प्रथा अजूनही कोकणात आहे. गणपती परत जाताना एका डोळ्यात पाणी आणि दुसरीकडे बाप्पाची मुर्ती डोळ्यात साठवून ठेवायची असते. ते काही शक्य होत नाही, मनाला हुरहुर लागून राहते. ज्यांच्या घरी गणपती असतो, त्यांच्या घरी तर हे दृश्य हमखास दिसेल.

        गणपती दरवर्षी नेमाने येतो जातो आणि आपण आपआपल्या जीवनात रमून जातो. गणपती उत्सवातून शिकण्यासारखे हेच आहे की, 4 दिवसाचा उत्सव आणि नंतर पुन्हा अनंतात विलीन होणे याची आठवण तर करून देत नसेल ना. आपले जगणेसुद्धा महोत्सव समजून जगावे आणि बोलविणे आल्यावर शांतपणे निघून जावे.

         गा-हाणे  म्हणजे तक्रार किंवा प्रार्थना असे म्हणता येईल. मग ही गणपतीलाच कादेवीला का नाहीत्याचे कारण गणपती हे आपले आराध्य दैवत मानले जाते. गणपतीचा चेहरा एवढा निरागस आणि मनमोहक, आपला हक्काचा असा वाटतो. बुध्दीचा  देवता म्हणून आपण सगळेजण मानतो. घरात दिड दिवसांपासून ते 10 दिवसांपर्यंत राहणारा हा पाहूणा सगळ्यांकडून लाड तर करुन घेतोच,परंतू लहान, मोठा (वयाने, पैशाने, मानाने किंवा मनाने) असा कोणताही भेदभाव देखील मानत नाही.सर्वजण त्यानिमित्त्याने एकत्र जमतात, खातात, मजा करतात, मतभेद विसरुन एकमेकांना  सांभाळून घेतात.

           काही जणांना देवाला सारखे गा-हाणे घालायची सवय असते. काही जण कौल म्हणतात. काही महत्वाचे निर्णय देवाला किंवा देवीला सांगीतल्याशिवाय करायचे नाहीत अशा प्रथा असतात. बहुधा जेथे माणसे श्रध्दाळू आणि गोंधळलेली असतात त्यांना कोणताही निर्णय घेणे कठीण असते अशा वेळी ते देवाला मध्ये घालतात ( आता ते किती खरे वा खोटे असते ते देवच जाणे). गा-हाण्याचा दुसरा अर्थ कोकणी मध्ये “किरकिर करणे” असा आहे. अडचणींचा पाढा वाचणे, अगदी छोट्या छोट्या गोष्टींचीसुद्धा तक्रार करायची काही जणांना सवय असते. 

          गणपती दरवर्षी येत असल्याने एक प्रकारचा जिव्हाळा आपलेपणा वाटत असतो. खाणे-पिणे, गोडधोडाचा नैवेद्य, फुले, फळे, दुर्वा, मोदक एकूणच आपण त्या दिवसात हरवून जात असतो. एवढा उत्सव किंवा तयारी आपण इतर कोणत्याही सणाची करत नाही. सगळ्यांनी एकत्र जमून लहान-थोर-मोठे, बायका-मूली सर्वजण तन्मय होतात. गणपती चरणी लीन होतात. हेच कारण असावे की हक्काने सांगण्यासाठी गा-हाणे घालण्यासाठी अधिकार आहे त्यांचा. 

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव