माहेरवाशीण
“माहेरवाशीण” ही संकल्पना आता लयास गेली आहे असे वाटते. सणासुदी निमित्त, बाळंतपण किंवा काही कार्यानिमित्त घरातल्या मुली सासरहून माहेरी यावयाच्या तेव्हा तिचे विशेष कोड कौतुक व्हायचे. त्यामागे तिच्या सासरचे कौतुक आणि माहेरपणाचा आनंद असा दोन्ही उद्देश असायचे. नेहमीच्या सासरच्या गडबडीत तिचे कोडकौतुक होईलच असे नाही. माहेरी सगळेजण आनंदाने तिचे स्वागत, काळजी आणि उत्साहाने काय हवे नको ते बघितले जायचे. विशेषत: ती दोन जीवाची असताना तर जास्तच.
आता
पुर्वीसारखे माहेर आणि सासर असे दोन ध्रुव राहिलेले नाहीत. किमान सासुरवास तरी इतिहास जमा झालेला आहे. मोठे घराणे, परंपरा आणि रितीरिवाज या थोड्याफार गावात पाळणे शक्य आहे. शहरात इतर अनेक कारणांमूळे पाळणे शक्य होत नाही. थोड्याफार जेवढ्या
परंपरा व रितीरिवाज पाळणे शक्य होत्या तेवढ्या आमच्या पिढीपर्यंत आम्ही पाळल्या परंतू पुढची पिढी
यापासून वंचितच राहील असे वाटते.
काही महिलांनी त्याच्यावर उपाय शोधून काढलेला आहे असे म्हणतात. एकत्र जमायचे,
हॉटेल किंवा रिसोर्टवर 4 दिवस धमाल करायची. यजमान म्हणून कुटूंबातील एक जण ही जबाबदारी आलटून पालटून वाटून घेतात. दुधाची तहान ताकावर भागते इतकेच. घरचा, मायेचा ओलावा व आजीचा स्पर्श याची अनुभूती यातून कशी येणार?. माहेरचा मोकळा श्वास ऊरात भरून घेऊन सासरच्या आव्हानांना समर्थपणे तोंड देणे प्रत्येक स्त्रीचे
कर्तव्य आहे तसेच माहेरची आठवण होऊ नये असे वागणेही सासरच्याकडून अपेक्षित
असते. माहेरचा भक्कम पाया पुढील
आयुष्यातील अनेक वादळे झेलू शकतो.
सासर आणि माहेर आता मुलींसाठी आणि मुलांसाठी सारखेच झालेले आहे. पुर्वीचा जावयाचा मानपान किंवा सुनेची सरबराई असे काही त्याचे अप्रुप राहिलेले नाही. कारण एकतर लांबच असतात व दुरून डोंगर साजरेच वाटतात. कधीतरी कारणा निमित्त परदेश प्रवास म्हणून किंवा मुलांच्या सोईसाठी म्हणून आजी-आजोबा किंवा सासू-सुनेची आणि आई-मुलीशी / मुलांशी संबंध येतो. तो गुडी-गुडीच असतो. पुन्हा परत आपआपल्या जागी येऊन स्थिरावतात आणि रुटीन आयुष्य पुढे सुरू रहाते.
Comments
Post a Comment