जाहिरात एक कला
जाहिरात ही एक कला आहे तसेच शास्त्रसुद्धधा आहे. लोकांच्या भावनांना आकर्षित करून त्यांचा सक्रिय सहभाग मिळवणे यासाठी केलेला एक अट्टाहास होय. थोडक्यात नवीन उत्पादनाची प्रसिध्दी, प्रचार आणि मालाचा खप वाढवणे या हेतूने जाहिरात केली जाते. या मागे प्रचंड अर्थकारण, प्रसिध्दी, अतिशयोक्ती आणि ग्राहकांना जाळ्यात ओढून आपला माल ग्राहकांच्या माथी मारणे हा दुय्यम हेतू असतो.
मर्यादित स्वरुपात जाहिरात करणे आवश्यक आहे. प्रसिध्दीपेक्षा जर डोकेदुखी जास्त झाली तर ग्राहक पाठ फिरवू शकतात, हे जाहिरात करणा-यांच्या डोक्यात कसे येत नाही हे मला कळत नाही. एकीकडे “ग्राहक हा राजा” असतो असे म्हणतात आणि दुसरीकडे त्याला जबरदस्तीने खरेदीसाठी भाग पाडले जाते हे कसे सुसंगत आहे? बरे, बाजारात नवीन वस्तू आली तेव्हा ठीक आहे. परंतू त्यांची किमान आवश्यकता आणि गरज लक्षात घेऊन ही जाहिरात करण्यात यावी असे वाटते. मला स्वत:ला काही जाहिराती आवडतात. जसे की व्होडाफोन, चितळे, अमूल बटर, एशिअन पेन्टस आकर्षित करतातच त्याच बरोबर मोलाचा सल्ला देऊन मनोरंजनही करतात.
दुरदर्शनवर नुकतीच एक फेसक्रिमची जाहिरात बघितली. त्यात प्रसिध्द अभिनेत्री काम करीत होती. माझा चेहरा कसा छान असे सांगत होती आणि मालिकेमध्ये त्याच अभिनेत्रीच्या चेह-यावर तारुण्य पिटीका दिसत होते. हे ग्राहक बघणार नाही का?
त्याचा काय परिणाम होणार? तसेच मालिका चालू असतानासुद्धा पडद्यावर आजूबाजूला आणि कित्येक प्रसंगात वस्तूंची, इतर मालिकांची बिनधास्त जाहिरात दाखवत असतात. याला कुणीच विरोध का करत नाहीत. किंवा त्यांच्यावर कुणाचे बंधन नाही का?
रविवारचा “रंगोली” कार्यक्रम रेडीओ एफएम ने प्रायोजित केलेला आहे. यात रेडीओचे चित्र पडदा अर्धा व्यापतात व उरलेल्या जागेत गाणी छोटी दिसतात.
त्यामुळे गाण्याची मजाच निघून जाते. बरं कोणत्या वेळी कोणत्या जाहिराती दाखवाव्यात याचे काही नियम आहेत का? साधारण संध्याकाळी 8 ते 10 च्या दरम्यान सर्वांची जेवणाची वेळ असते. त्याचवेळी “Toilet Cleaner” किंवा “Whisper” च्या जाहिराती दाखवतात. या जाहिरातीमूळे नक्की फायदा होतो का? का जाहिरातीचा खर्च दाखवून नफा कमी करणे हा एक हेतू असू शकतो. सामाजिक माध्यमावर येणा-या जाहिरातींमूळे कित्येकदा ग्राहकांची फसवणूकच होते. कधी माल निकृष्ट दर्जाचा असतो तर कधी रकमा जावून माल मिळतच नाही. त्यामुळे जाहिरातींवर अवलंबून राहून निर्णय घेऊ नका. किती वेळा आणि किती वेळ कोणती जाहिरात दाखवावी
यावर काही नियम असावेत. सगळ्यांनी विचार करा आणि सावध रहा.
Comments
Post a Comment