शोधा म्हणजे सापडेल

               कोणाचे काय तर कोणाचे काय नेहमी काहीना काही हरवत असते. आमच्या घरात  कायम हत्ती हरवत असतो. कसा ? माझ्या घरात पसारा खूप आहे त्यामुळे हत्ती हरवला तरी सापडणार नाही असे माझ्या नवरोजींचे प्रामाणिक मत आहे. हे मत महिन्यातून एकदा तरी ऐकायला मिळते. तरी बरे, राणीबाग जवळ असल्यामूळे तिथे तो सापडतो. वास्तविक माझ्या ऑफिसमधील माझी केबीन बघून खूप जण खूष होतात. मैत्रिणी तर म्हणतातकेबीन एवढी सुंदर तर घर किती सुंदर आणि स्वच्छ असेल”!. म्हणो बापडे!

          घरात  माझे काही चालत नाही कारण एक विरुध्द तीन असा मामला असतो ना? तुमचे मत कळवा हं.  तर असे हे हरविणे हा  एक दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक असतो. महत्वाच्या गोष्टी हरविल्या तर मिळेपर्यंत चैनच पडत नाही. आमच्या लहानपणी काकांनीहरविलेल्या गोष्टी सापडण्यासाठीएक मंत्र दिला होता तो म्हटला की वस्तू मिळत असत. मोठे झाल्यावर तो मंत्र आम्ही विसरलो आणि वस्तू हरविणे सूरूच राहिले. तशा माझ्या हातून वस्तू कमी हरवतात  वयोपरत्वे त्या कुठे ठेवल्या होत्या ते आठवत नाही.

          तर मंडळी वस्तू हरविणे हे एक वेळ समजू शकते माणसेसुद्धा कधी कधी हरवतात. कधी जत्रेत, तर कधी वाईट हेतूने, कधी स्वत:हून, कधी दु:खात, कधी सु:खात, कधी कामात, तर कधी नको त्या आठवणीत! त्यातून बाहेर कसे पडायचे? वास्तवाची जाणीव करून घेऊन तर कधी शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून तर कधी दुस-यांच्या मदतीने स्वत:च स्वत:ला सापडत जाणे हे किती महत्वाचे असते ते हरविल्याशिवाय कसे कळणार? वस्तू हरविल्यावर त्याचे महत्व कळते ना! तर तुम्ही  शोधा काय काय हरवले आहे आपण ? खेळकरपणा, खोडकरपणा, निरागसता, खरे बोलणे, मनापासून बोलणे इत्यादी .. याची यादी बरीच मोठी असेल पण पुन्हा आठविण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून वयाची झूल जी अंगावर घेतली आहे ती थोडीशी बाजूला होऊन पुन्हा नव्याने आपलीच आपल्याला ओळख पटेल. बाय वे, तसेच काही महत्वाचे आणि मनापासून हवे असेल तर तो मंत्र एवढ्या वर्षांनी पुन्हा सापडला आहे तो तुमच्या माहितीसाठी देत आहे. मोठ्या मेहनतीने बहिणीने तो शोधून काढला आहे. त्याचा गैरवापर करू नका हं. आपल्या संस्कृतीत सर्व गोष्टींवर पर्याय आहे. फक्त ते आपण शोधले पाहिजेत ना मनापासून !  धुंडनेसे तो खुदाभी  मिल जाता !  मंत्र खालील प्रमाणे दिलेला आहे, तो हरवू नये.  

                                !! कार्तवीर्यार्जुनोनाम राजा बाहू सहस्त्रवान् !

                                  तस्य नामस्मरण्मात्रेण गतं नष्ट लभ्यते !!

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव