“एकमेका सहाय करू अवघे धरू सुपंथ” अशी एक म्हण आहे.
प्रत्येक जण कधी ना कधी कोणत्याना कोणत्या स्वरुपात कोणाची तरी मदत घेतच असतो. काही जण माहितीतले, नात्यातले, ओळखीचे असतात तर काही जण अनोळखी, काहीही संबध नसलेले असतात. मदत मग ती आर्थिक, भावनिक, शैक्षणिक, मानसिक किंवा इतर कोणत्याही वस्तू स्वरूपात असू शकते. छोटीशी मदत एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी उपयोगी होते तर कधी फार मोठी उदभवणारी समस्या सहजच सोडवली जाते. पुढे होणारे अनेक संदर्भ बदलू शकतात.
काही माणसे
आम्हाला “कुणाचीच गरज नाही” या थाटात वावरत असतात. अडीअडचणीला धाऊन जाणे हे तर प्रत्येकाचे कर्तव्य असते, मग त्यात उपकार कसले? त्या त्या वेळेचे महत्व कधी कधी पैशापेक्षा जास्त असते. पैशाने आपण सर्व काही विकत घेऊ शकतो असा ही काही जणांचा गैरसमज असतो. तो ही कधी कधी फोल ठरतो.
काही जण कायमच दुस-यांची मदत घेत असतात किंवा तशी दरवेळी अपेक्षा ठेवतात. त्यासाठी त्यांनीही कुणाला तरी मदत केलेली असली पाहिजे. “कर भला हो भला” असे म्हणतात ते उगीच नाही. चांगली कामे केली तर ती आपल्याला नंतर कोणत्याना कोणत्या स्वरूपात परत मिळतात. त्यासाठी लागणारा मनाचा मोठेपणा आणि मदत करण्याची वृत्ती अंगी बाळगली पाहिजे. अडचणी काही सांगून येत नाहीत. योग्य वेळी योग्य माणसाची हक्काने मदत घेणे किंवा देणे हेही तेवढेच आवश्यक असते. कित्येकदा शेजारी, नातेवाईक मदतीला धावून येणारे असतात. रामायणात खारुताईची गोष्ट नेहमी सांगितली जाते. गरजेला उपयोगी पडणारा माणूस खरी माणूसकी दाखवतो असे म्हणता येईल. एका विख्यात कवीच्या भाषेत “घेता घेता देणा-याचे हात घ्यावेत” माणूस समाजप्रिय असल्यामूळे त्याला इतरांची आवश्यकता भासते. आधुनिक तंत्रज्ञान आणि स्वयंशिस्त
बाळगून काही प्रमाणात तो स्वावलंबी बनू शकतो परंतू कोण तरी, कुठे तरी अज्ञात माणसे
काम करतात म्हणून आपण आराम करु शकतो हे प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे. त्याच
बरोबर इतरांच्या कष्टाची जाणीव व हातभार लक्षात घेऊन नेहमी त्याबद्दल कृतज्ञ
राहीले पाहिजे.
Comments
Post a Comment