मातृत्वाचे उदात्तीकरण
कॉलेजमध्ये असताना “मदर इंडीया”, “अमर प्रेम” सिनेमे पाहिले होते, गाण्यासाठी आणि आवडती नायक व नायिका होत्या म्हणून. पण त्याचा खरा अर्थ कळायला खूप वर्षे जावी लागली, मातृत्वाची खरी महती आई झाल्यावर कळते असे म्हणतात. मातृत्व ही नैसर्गिक व स्त्री सुलभ भावना आहे. बायको गेल्यानंतर मुलांचे मातृत्व निभावून नेणारे पुरूषपण असतात. ही जाणीव जोपासली पाहिजे या मातृत्वासाठी कोणतेही दिव्य करायला स्त्री मागे-पुढे पहात नाही.
वीर जिजामाता, झाशीची राणी, मदर तेरेसा, सिंधूताई सकपाळ यांनी मातृत्वाचा अर्थ आणखी व्यापक केला. हिरकणीची गोष्ट लहानपणापासून आपण ऐकत आलो. अशा या स्त्रिच्या उपजत भावनेचे उदात्तीकरण जेवढे तुम्ही कराल तेवढे थोडेच आहे. स्त्रियांचा गैरफायदा घ्यायला पुरूष टपलेला असतो.
प्रत्येक पुरूषाच्या मागे एक स्त्री आई, बहिण, बायको असते. लहान भावडांची, दिरांची, सास-यांची ती काळजी आईच्या मायेने घेत असते. अशा या मातृत्वाचा सन्मान फार कमी जण समजून घेतात. मोठे झाले, पंख फुटले, शिंगे फुटली तरी आईला न विसरणारे आहेत. तसेच काही जण हळूहळू लांब जातात किंवा दूर होतात. हेच मातृत्व नंतर नातवांच्या बाबतीत अती हळवे बनते व दोन पिढींचा दुवा ठरते. जेव्हा या दोन पिढ्या एकत्र राहतील तेव्हाच ना! आता तर गावात काय शहरात काय मुले लांबच रहातात. कितीही सुपर वुमन बनण्याचा प्रयत्न केला तरी कुठेतरी कमीच पडतो, असे ब-याच स्त्रियांना वाटते व काहीजण जाणवून देतात. महाभारतात मातृत्वाची अनेक उदाहरणे बघितली.
पक्षी प्राणी यांच्यामध्ये सुद्धा मातृत्वाचा आदर केला जातो. मातृत्व शक्य नसल्यास हल्ली सरोगसी, टेस्टट्यूबद्वारे किंवा मुले दत्तक घेऊन मातृत्वाची भावना जपू शकतो.
काही संस्था याच सामाजिक जाणिवेतून अनाथमुलांचे पालनपोषण करीत असतात म्हणूनच या भावनेचे उदात्तीकरण करणे आवश्यक आहे.
स्वत: मुलाला जन्माला घातले तर मातृत्व प्राप्त होते असे नाही. काही अशी पण उदाहरणे आहेत नातलग, भाचे-भाची, दत्तक मुले यांच्यावर जन्मदात्रीपेक्षा जास्त प्रेम करणारे. मदर इंडीया मधील आई जशी प्रसंगी कठोर होते तशीच श्यामची आई कायम लहान मुलांसाठी आदर्श ठरते. परदेशातसुद्धा मातृत्व आदरणीय आहे. “Not Without My Daughter” या पुस्तकात मातृत्व अधोरेखित केलेले आहे. अशा मातृत्वाला माझा सलाम.
Comments
Post a Comment