भारतीय इकेबाना

 

“इकेबाना” म्हणजे “फुलांची आकर्षक सजावट”. इकेबाना, जपानी कलेचा एक प्रकार आहे. भारतात  या आधीच “इकेबानाचा” अप्रत्यक्षपणे वापर करत होते. जेव्हा मी लग्न समारंभात जायचे तेव्हा सजविलेल्या सॅलेड सजावटीचे खूप कुतूहल वाटायचे पण विचारायचे कोणाला? तसे कापलेले गाजराचे आणि बीटचे डोके पाण्यात ठेवल्यावर त्याचे उगवलेल्या झाडाचे निरीक्षण करणे हा आवडता उद्योग होता. मर्यादित आणि ऋतूमानानुसार होत असे. त्यासाठी मी अनेक पुस्तके शोधली. आता तर इंटरनेट आणि व्हॉटसअपमूळे सहज माहिती मिळू शकते. त्यावरून मी प्रयोग करायला लागले. हळूहळू उत्साह आणि आत्मविश्वास वाढला. मग मुलांना व इतरांनाही शिकवू लागले.

     भाजी व फळे यांचे कलात्मकरित्या कर्तन करून नवीन एखादी आकर्षक रचना करणे ही एक कला असून मनोरंजन, उपयुक्तता आणि कमवायचे घरगुती साधन होवू शकते.  यासाठी लागणारे साहित्य, ताजी भाजी व  फळे यांची आवश्यक तेवढी जमवाजमव करावी लागते. घरगूती पार्टीत “इकेबाना” आकर्षक भूमिका बजावतो. क्रियाशिलतेला वाव मिळतो. सर्वोत मोठी गरज खवय्याना, हॉटेल व्यावसायिकांना, कॅटरर्स, देऊळ यांना असते. ऋतूमानानुसार वेगवेगळे प्रकार बनविले जाऊ शकतात. “इकेबानाचे” विविध आकर्षक प्रकार पाहून लोकांना आल्हाददायक वाटते. कांद्याची फुले, संत्रा-मोसंबीची बास्केटस, टॉमेटोचे गुलाब, शेवग्याच्या शेंगेला कांद्याची फुले, गाजराच्या चकत्या लावून फूलदाणी सजविणे, कांद्याच्या पातीचे “जोकर” बनविणे, अख्खे कलिंगड विशिष्टरित्या कापून त्याचे फुल बनविणे. पपईचा बाऊल बनवून त्यात कोशिंबीर व इतर वस्तू ठेवणे. सफरचंदाचे बदक, कारल्याचे मगर बनविणे इत्यादी अनेक प्रकार करता येतात. यात नारळाला जास्त वाव आहे. अगदी करवंटी, काथा आणि शेंडीचा उपयोग करून कला सादर होवू शकते. यात दिवसेंदिवस अनेक कलाकृतीची भर पडत असते. नाविन्याला या क्षेत्रात खूप वाव आहे.  

       एकच खबरदारी घेणे आवश्यक आहे. फळे व भाज्या ताज्या असाव्यात, ज्याच्यापासून कलाकृती बनविणार ते 10 मिनिटे मिठाच्या पाण्यात ठेवावेत. तदनंतर कडक होईपर्यंत फ्रिजमध्ये ठेवावीत. बाहेर काढल्यावर किडा / मुंगी लागू नये याची काळजी घ्यावी. कृत्रिम रंग शक्यतो वापरू नयेत. “इकेबानाचे” वैशिष्ट म्हणजे काम संपल्यावर त्याचा इतर कामासाठी उपयोग होऊ शकतो किंवा खत म्हणून वापर करु शकतो. घरगूती किंवा कुटीर उद्योग म्हणून मान्यता मिळण्यास हरकत नाही.  शाळेत मुलांना वेगवेगळे प्रयोग करावयास सांगतात त्यावेळी असा एखादा प्रकार बनविल्यास सर्वांना आवडेल, प्रदर्शनात, गणपती-गौराईसमोर ठेवता येईल जेणेकरून प्रेक्षकांचे लक्ष वेधले जाईल. 

         चला तर मग आता घरात राहून काहीतरी क्रियाशील कृती करूया आणि स्वत: बरोबर इतरांना दृष्टीसूख देऊया.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव