उणीव आणि भरपाई

 

जन्माला येतानाच आपण काही चांगले वाईट गुण, दोष सोबत घेऊन आलेलो असतो. दिलेल्या गोष्टीचा जास्तीत जास्त उपयोग करून स्वत:चे इतरांचे जो भले करतो तो सर्वगुण संपन्न असे म्हणता येईल.  खरे तर सर्वगुणसंपन्न असा देवच असू शकतो, माणूस कसा असेल? मोठी माणसेपण कधी कधी काही चुका करतात, ज्यांचे परिणाम पुढे पिढ्यानपिढ्या चालूच असतात. उणीव भरून काढण्यासाठी काय करावे लागेल हे जेव्हा कळते तेव्हा तो त्या दिशेने प्रयत्न करायला लागतो. शेवटी व्यक्तिमत्वातील विकास हेच अभिप्रेत आहे. बऱ्याच वेळा आई मुलांना नौकरीमुळे वेळ देवू शकत नाही म्हणून इतर अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करते. कारण तिला असे वाटते की आपण कुठे तरी कमी पडतोय. पण त्यामुळे मुले लाडावतात आणि कधी कधी आत्मनिर्भर बनतात.  दोन्ही परिणाम होऊ शकतात.

              निसर्गातसुद्धा प्रत्येक वेळी प्रत्येकाला एक चांगला एक वाईट गुण दिलेलं आढळून येईल. आपल्यात काहीजण सव्यंग असतात, त्यांनासुद्धा देव इतर गोष्टी भरभरून देत असतो. ही उणीव भरून काढण्यासाठी कधी कधी  मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, नवऱ्याला बायको किंवा बायकोला नवरासुद्धा मदत करत असतो. त्यालाच तर साथी हात बढाना” असे म्हणत असावेत. ही उणीव कधी पैसे, सौंदर्य, बुद्धिमत्ता, मेहनती स्वभाव किंवा जिद्द यांची असू शकते. पण गंमत सांगू का, आपल्याकडे काय आहे तेच कळत नाही काही लोकांना. जे नाही त्याच गोष्टी लक्षात ठेऊन सारखे निराश होत असतात. सख्ये बहिण भाऊसुद्धा एकसारखी नसतात तर इतरांना कसे आपण एकसारखे वागावे अशी अपेक्षा करू शकतो?  त्याने माझ्या मनासारखे वागले पाहिजे असा आग्रह कसा धरू शकतो?

           प्रत्येकाची परिस्थितीनुरूप जडण घडण होत असते. नैसर्गिक ठेवण, संस्कार असे अनेक घटक याला कारणीभूत असतात. अनेक उणीवा आपण प्रयत्नाने घालवू शकतो किंवा कमी करू शकतो. उणीवावर मात करूनच तर आपल्याला पुढे जायचे असते. चला,  तर मग, आपण या उणिवा शोधून काढू आणि त्याची इतर गोष्टीने भरपाई करू.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव