अशी ही दुनियादारी

             दुनियादारी म्हणजे “घरचे काम सोडून दुनियाभरच्या लोकांना त्यांच्या कामात मेहनत घेऊन नि:स्वार्थीपणे  मदत करणे”. मग ती आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, भावनिक आणि मानसिक असू शकते. याव्यतिरीक्त फुकटचा सल्ला देणे, मार्गदर्शन करणे, दिशा दाखवणे ही सुध्दा दुनियादारीची उदाहरणे आहेत.

            सामाजिक माध्यमाद्वारे आपणही आपल्या नकळत अशी फुकटची दुनियादारी करत असतो. जसे की, उपयुक्त माहिती (दवाखान्याची माहिती, उपयुक्त पुस्तके, नौकरीची माहिती, वर्तमानपत्रे, शासकीय माहिती) पुढे पाठविणे.  काही जण दुस-याला “कमी लेखून उपदेश वजा डोस पाजत असतात”. तर काही जण आवश्यक असूनही मला काय त्याचे?  म्हणून तटस्थ भुमिका घेणारे (दाणे टिपून जाणारे) तर काही जण “नरो वा कुंजरोवा” प्रकारचे,  काही जण शुल्क आकारूनसुद्धा शहाजोग सल्ला देणारे,  असे अनेक प्रकारचे नमूने आयुष्यात प्रत्यक्ष बघायला मिळतात, ही एक प्रकारची दुनियादारी होय.

              पु.लं.च्या “व्यक्ती आणि वल्ली” मधील “नारायण” सारख्या काही निस्वार्थीपणे काम करणा-या व्यक्ती असतात. दुस-यांचे दु:ख ते आपले दु:ख मानणारे, दुस-यांच्या सुखात स्वता:चे सुख मानणारे, “बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना” या सारखीही माणसे असतात. त्यांच्या परीने ते इतरांना मदतच करीत असतात पण काहीजणांना त्यांचा विनाकरण त्रास होतो. दुनियादारी करणा-यांच्या घरातील लोकांना “काय हा वैताग” असे वाटण्याचा संभव असतो.

                अशा या दुनियादारीचे मात्र काही जणांना जन्मजात वेड असते. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत ते इतरांचा विचार करून इतरांच्या मदतीला तत्पर असतात. काही जण दुनियादारी करणा-यांचा गैरफायदा घेतात. छोटी छोटी कामे सांगून त्यांचा मोठा वेळ घेऊन काम झाल्यावर त्यांच्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतात.

               लॉकडाऊनच्या काळात याचा चांगला अनुभव आला. सोसायटीतील एकल माणसे, रुग्ण, सरकारी कर्मचारी जे आवश्यकतेनुसार कामावर जात होते, यांना आपणहून मदत करणारे, त्यांच्या अडी-अडचणीला धावून जाणारे.  अगदी कोविड रुग्णाला उपचार मिळवून देणारे, हॉस्पिटलमध्ये रक्ताची गरज भागविणारे, आरोग्य विमा मिळवून देणारे, इत्यादि  परिस्थितीनुसार अनेक स्वयंसेवक आपणहून तयार झाले.

               अशा या दुनियादारीचे कौतूक नक्कीच झाले पाहिजे  आणि त्याची निदान थोडी जाणीव तरी ठेवली पाहिजे. पण नेमके उलटे होते,  “केले तर काय झाले? त्यात काय मोठे!” अशीच धारणा ब-याच जणांची असते. त्यामूळे आता सहसा कोणी कोणाच्या भानगडीत पडत नाहीत. शक्य असेल तेव्हा मदत केल्यावर आता “पुढचे सर्व सोपस्कार तुम्हीच करा” असाही अनुभव कधी कधी येतो. एकाला अशा दुनियादारीचा फायदा झाल्यावर त्याने पण तो घेतलेला वसा दुस-यापर्यंत पुढे नेला पाहिजे.  तर ती साखळी चालू राहील.  त्यालाच आपण “ एकमेका साह्य करू”, “लाभेविण प्रिती” तसेच “अज्ञात देवदूत” असे म्हणू शकतो.

               चला तर मग आपणही असे कोणाला तरी “उपयोगी पडून खारीचा वाटा उचलूया आणि मानसिक समाधान कमवूया”. सध्या आपण सगळेच कठिण परिस्थितीतून जात आहोत. तरी, अशा दुनियादारीची सगळ्यांना  नितांत आवश्यकता आहे. 

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव