औक्षवंत व्हा

              सुलूचा परवा वाढदिवस होता. आता खर म्हणजे वाढदिवस साजरे करायचे दोघांचे वय रहिलेले नाही  परंतू आपला जन्मदिवस सहसा असा कोणी विसरत नाही. आठवणीने दोन गोड शब्द, शुभेच्छा व्यक्त केल्यास समाधान वाटते एवढेच. आम्हा मैत्रिणीमध्ये एक अलिखित नियम आहे की, फक्त वाढदिवसाच्या दिवशी फोनवरून शुभेच्छा द्यावयाच्या जेव्हा फोन नव्हता तेव्हा प्रत्यक्ष भेट  मुद्द्दाम घेत होतो. तेव्हा एखादा गजरा ! गुलाब वगैरे (ग्रिटींग मिळाल्यास) द्यायचे बस्स एवढेच!   किती कौतुक वाटायचे लहानपणी आई आम्हाला गोड पदार्थ खायला देऊन फ्रॉक घालायला द्यायची (असल्यास मुद्दाम नव्हे)  आणि नंतर ओवाळायची त्यातच किती आनंद व्हायचा.  आता वाढदिवस म्हणजे किमान रु. 500/- पासून आपण खर्च करु त्या प्रमाणात वाढदिवसाचे स्तोम असते. शाळेत भेटी / चॉकलेटस पाठवा, घरी मुलांना बोलवा.  आलेल्या मुलांकडून नको त्या भेटी स्विकारा.  इतर सजावट खाणे पिणे, त्याची दिवसेदिवस तयारी यात वेळ घालवा. यात आणखीही काही भर असेलच. त्यामुळे वाढदिवसाचा मुख्य उद्देश किंवा त्या दिवसाचे महत्व दिसून येत नाही.

           वाढदिवस म्हणजे जन्मलेल्या दिवसाची आठवण ठेवणे. तेवढी वर्षे आपण  जगात येऊन यशस्वी रित्या पूर्ण केली तो दिवस.  उलट तेवढी वर्ष आयुष्यातून कमी झाली याचेही एक प्रकारचे स्मरण असते.  हल्ली तर मोठ्या लोकांची शिकवण त्या दिवशी आठवणीने अंमलात आणल्यास खरा वाढदिवस / जयंती साजरी करून त्या नेत्याला एकवेळ समाधान वाटेल (स्वर्गात), शांती लाभेल. उदाहरण द्यायचे झाल्यास पं. नेहरूंच्या किंवा गांधी जयंतीच्या दिवशी त्यांना आपल्याकडून जे[i] अभिप्रेत होते परंतू त्यांच्या हयातीत जे साध्य होऊ शकले नाही ते साध्य करून दाखविल्यास खरे आपण वाढदिवस साजरे केले समजावयास हरकत नाही. त्याऐवजी आपण काय करतो? मोठे मोठे हार आणून फोटोंना घालतो. सुट्टी घेऊन घरी आराम किंवा इतर तत्सम कार्यक्रम आखतो. अशा नको त्या रितीने नकळत त्यांना दुखवत असतो म्हणून मला असे वाटते की, आताच्या पिढीने कुठेतरी बदल करायला हवा. खालीलप्रमाणे नवीन प्रकारे आपण आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा करून आपल्या इतरांच्या कायम स्मरणात राहील अशा प्रकारे वाढदिवस साजरा केल्यासऔक्षवंत व्हाहा आशिर्वाद खरा होईल.

 1.  घरी वाढदिवस साजरा केल्यास किमान किती खर्च आला असता तेवढी रक्क्म बाजूला ठेऊन ती रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरणे.

2.   आर्थिक देणे शक्य नसल्यास किंवा योग्य वाटत नसल्यास खाऊ, फराळ, पुस्तके, वह्या, पेन्सिली, कपडे इत्यादी गरीब विद्यार्थांना किंवा अनाथाश्रमास देऊन येणे.

3.  आजूबाजूला असे बरेच जण असतात कि ज्यांचे पैश्याअभावी शिक्षण राहिलेले असते. त्यांना त्या वर्षासाठी मदत करणे (उदा. दुधवाला, इस्त्रीवाला, कामवाली बाई / गडी, फुलवाला, शिंपी इत्यादी)

4.  वृध्दाश्रम, मुक बधिर शाळा, पुनर्वसन केंद अशा अन्य ठिकाणी मासिक / वार्षिक देणगी देणे.

5.  शाळेच्या ग्रंथालयाला किंवा स्थानिक ग्रंथालयाला भेट म्हणून पुस्तके देणे.

6.  रक्तदान, श्रमदान, वृक्षरोपण, दृष्टिदान आणि अवयव दान करण्याच्या दानपत्रिका तयार करणे.

7.  जन्मदिवशी एक तरी झाड लावणे किंवा भेट देणे.

8. तुम्हाला योग्य वाटेल तो किंवा वेळेची गरज ओळखून एखादा नवीन मार्ग शोधावा.

         खरं म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी आई-वडीलांना, देवाला पाया पडणे हे महत्वाचे असते. एखादा जीव जन्माला येण्यासाठी आई-वडील, निसर्ग समाज या तिघांच्या सहकार्यावाचून शक्य नसते.  तेव्हा या प्रसंगी या तिघांचे ऋण मानून यापुढे असेच सुदृढ आयुष्य लाभो असे आशिर्वाद घेणे महत्वाचे असते. तुम्ही म्हणाल मग आम्ही वाढदिवस करू नये का?. एकच दिवस तर मजा असते, मजा करावी पण थोडी सामाजिक जाणीव ठेवल्यास आपला आनंद द्विगुणित होईल. आमचे एक साहेब ऑफिसमध्ये सगळ्यांचे वाढदिवस आठवणीने साजरा करतात, मग त्यात भेदभाव नाही. कित्येक वेळा स्वत: त्या अधिका-याच्या / कर्मचा-याच्या कोणालाही तारीख लक्षात नसते  साहेबांच्या बरोबर लक्षात असते. कार्यालयीन रुक्ष जीवनात तेवढीच एक हिरवळ आणि त्यामुळे जी आपुलकी निर्माण होते ती महत्वाची. थोडासा खिसा रिकामा होतो किंवा काही जण नाक मुरडतात  त्यांचा दृष्टिकोन महत्वाचा!  अशा वेळी हे वाढदिवस छोट्या प्रमाणात साजरे करणे आवश्यकच आहे, असे मी म्हणेन.

                      याबाबतीत माझ्या आत्याचे उदाहरण आदर्श म्हणावे लागेल. जो पर्यंत ती होती तो पर्यंत आठवणीने हिंगण्याला महिला आश्रमासाठी” देणगी पाठवायची.  आत्याने मरणोपरांत  श्राध्द विधीत विनाकारण पैसे घालविता सर्व रक्कम आश्रमात दान द्या.  अशी अंतिम इच्छा तिने लिहून ठेवली होती. आता या गोष्टीला 25 वर्ष पूर्ण झाली अजून तिचा भाचा तिची अंतिम इच्छा कसोशीने पाळत आहे. काही समर्थक म्हणतील की यात यात एकमेकांकडे जाणे होते, त्या निमित्ताने भेटतो, विचारांची देवाणघेवाण होतेमुलांचे एक दिवस कौतुक करायचे नाही तर कधी करणार? फक्त 5-10 वर्षापर्यंत वाढदिवसाचे कौतुक पारंपारिक पध्दतीने केले जाते. नंतर आपआपल्या मित्र-मैत्रिणीसमवेत ऑफिसमध्ये वाढदिवस साजरे करतात. हे  एका दृष्टिने योग्य आहेत्याचा अतिरेक करू नये या सोहळ्यास प्रसिध्दीचा मोठा भाग करू नये असे वाटते. बघा तुम्हाला पटतंय का? पटल्यास नवीन मार्ग शोधून वाढदिवस साजरा करूया आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा मिळवूया ज्या आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात अत्यंत मोलाच्या आहेत.



 

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव