नको बडबड, हवी कृती

 

            “ नको बडबड, हवी कृती” हे ब्रीद वाक्य सेनेतील जवानांचे आहे. वास्तविक त्यांना बोलायला आणि बडबडायला वेळ कुठे असतो? कायम देशाच्या संरक्षणासाठी वाहून घेण्याचे व्रत घेतलेले असल्यामूळे जो काही विरंगुळा घरी आल्यावर मिळत असेल तेवढाच.

               मला ते ब्रीद वाक्य फार आवडते. मी स्वत: फार अबोल आहे. बोलण्यापेक्षा ऐकणे जास्त आवडते. कुणी कसेही बोलले तरी मी  जपूनच शब्द वापरते. कधी कधी वाईट वाटते की, मला देवाने हजरजबाबी किंवा बडबडी का बनविले नाही? आताच्या जगात बरीचशी कामे गोड बोलण्याने होतात, तेव्हा आमच्यासारखे कमी बोलणारे जगाच्या दृष्टीने मागेच असतात. काही वेळा मनातले भाव बोलून दाखविल्याशिवाय समोरच्या व्यक्तिस त्याची जाणीव होत नाही अशा वेळी बोलणे आवश्यक असते.  काही वेळा काही जण उगीचच वेळ घालविण्यासाठी गप्पा मारीत असतात तेव्हा  मला राग येतो. असे वाटते की जर एवढा वेळ त्यांनी सत्कारणी लावल्यास जगाचे भले होईल.  या निरर्थक गप्पांमध्ये 90% कूणाची तरी उणी-दुणी, चुका, टिका-टिपण्णी याचा भाग जास्त असतो. त्यामुळे विनाकारण वाईट गोष्टींचा फैलाव होतो. खरं-खोटं करायला कुणाला वेळ नसतो. त्यामुळे Gossips (अफवा) वाढण्यास मदत होते. त्याऐवजी ज्या गोष्टी घडल्या त्याच्या चर्चेत वेळ घालवल्यास  वेळही वाचेल ध्वनी प्रदुषण कमी होण्यास मदत होईल.

             वैज्ञानिक दृष्ट्याही आपण 1/3 इतकी शक्ती बोलण्यामूळे वाया घालवित असतो. त्या ऐवजी तीच शक्ती विधायक कार्यात वापरल्यास किती बरे!  साधी सांत्वनाची गोष्ट घ्या. एखाद्या घरातील व्यक्ती मरण पावल्यावर लोक भेटायला जातात तेव्हा तेच तेच बोलत असतात.  हल्ली मुद्दाम कोण जात नाही  तो, ती आला / आली नाही हं, बघ असे मागून टिका होते. त्याऐवजी गेलेल्या माणसाचे गुण आठवून त्याची काही इच्छा-आकांक्षा पूर्ण करायचे ठरविल्यास तेच मोठे सांत्वन ठरेल किंवा काही मानसिक आधार किंवा आर्थिक मदत देऊ करणे हे जास्त संयुक्तिक ठरेल.  भेटणा-याची वर्दळ कधी संपेल असे वाटणे हे योग्य वाटते का? ज्याप्रमाणे देशातील कोणतीही अतिमहत्वाची व्यक्ती गेल्यास सगळे मनोरंजनाचे कार्यक्रम बंद करणे . श्रध्दाजलीचे प्रकार अनुसरले जातात. 3 मिनिटे मौन पाळून त्यांच्या विचारसरणीनुसार एखादी गोष्ट जर अंमंलात आणावयाची ठरविल्यास ती खरी श्रध्दांजली ठरेल.

             काही व्यक्ती अबोल, घमंडी आहेत असा इतरांचा गैरसमज होत असतो. अशा व्यक्ती पटकन बोलत नसल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवणे जास्त श्रेयस्कर समजले जाते. या उलट फटकळ / बडबड्या व्यक्तींवर सहसा कोणी विश्वास ठेवत नाही. भलेही अशा व्यक्ती मनातून निर्मळ असतात. काही प्रमाणात इतरांची मने दुखविली जातात. हे  अशा व्यक्तींच्या लक्षात येत नाही आणि जेव्हा लक्षात येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते.

           लहान मुलांच्या बाबतीतही आपण हल्ली मोजून मापून बोलतो कारण ती अनुकरणप्रिय असतात. मग मोठ्यांच्या मनाला नको का जपायला? असे म्हटले जाते की वाईट बोलण्याने काय शरीराला भोक पडतात?  परंतू मनाला त्रास होतो. मनाला झालेल्या वेदना लवकर बुजविल्या जात नाहीत. लहानपणी हे संस्कार मुलांच्या मनावर रुजविले गेले पाहिजेत कीकमी बोल. चांगले बोल. योग्य तेच बोल”.  ही शिकवण आपल्याला माहित असते पण त्यावर अंमल किती करतो यावर अवलंबून आहे.

             कदाचित काही जण माझ्या या ब्रीद वाक्यावर नाराज होतील,  थोडा विचार केल्यास आपल्याला हे पटेल आपणही याबाबत विचार कराल. साधी गोष्ट कुणी भेटले तर नमस्कार / चमत्कार, हाय हॅलो अशा अनेक शब्दांची देवाण घेवाण होत असते. त्याऐवजी नुसते स्मितहास्य  परिणामकारक ठरते. ज्यावेळी आवश्यक असेल तेव्हाच शब्दांची मदत घ्यावी अन्यथा हास्य आणि डोळ्यांनी विचार व्यक्त करू शकतो. अशा वेळी शब्द शब्द वेचित जा, जपून ठेव बकुळीच्या फुलापरीया गाण्याची आठवण येते.

         अगदीच अबोल असावे असेही माझे म्हणणे नाही. काही वेळा शब्द, वाक्यही माणसाला धीराने वागायला, संकटे पार पाडायला, प्रोत्साहन द्यायला, माणसे जोडायला तसेच तोडायला मदत करत असतात. ही मोठी देणगी देवाने माणसाला दिलेली आहे. वाणीमूळे माणूस विचारांची, भावनांची देवाण-घेवाण करू शकतो. अशा या बडबड पुराणाला माझा सलाम कारण तुम्ही म्हणाल, “अहो, तुम्ही लेखणीद्वारे एवढ़े बडबडलातच की!”

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव