असाही एक डोळस महिला दिन

                नुकतीच एक अंध महिला आय..एस. झालेली बातमी ऐकली. तिच्या जिद्दीचे कौतुक वाटले. त्याचबरोबर एका महिला दिनाच्या कार्यक्रमाची आठवण झाली. त्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व पारितोषिक विजेत्या महिला अंध असून कोणी लेखापरीक्षक, वृत्तनिवेदक, नृत्यांगना, धावपटू, पोहणारी, गायक, वादक, इंजिनीअर आणि एक जण चक्क एका कॉलेजची मुख्याध्यापककम प्रसिद्घ लेखिका होत्या. हा  कार्यक्रम बघण्यासारखा आणि त्यातून बरेच काही शिकण्यासारखा होता. कुठेही, कोणतीही कमतरता जाणवली नाही. फक्त माझ्या सारखे काही प्रेक्षक डोळस होते.

          निसर्गाने  काही "कमी" दिल्यावर दुसरीकडे भरपाई देऊन ठेवलेली असते.  मग माणूस हरेलच कसा? त्यात स्त्रिया तर कधीच हरत नाही ना दुसऱ्यांना हरायला देत. कधीं कधीं डोळस माणसेच आंधळ्यासारखे वागतात याची अनेक उदाहरणें आपण अवतीभवती बघत असतो. आंधळे प्रेम, अतिविश्वास आणि अतिरेकी वागणुकीतून दुसऱ्यांना त्रास देणारे, दुस-यांचा गैरफायदा घेणारे, दुस-यांकडे वाईट नजरेने बघणारे. एवढे सुंदर डोळे आपल्याला मिळाल्याचा आपण किती चांगला उपयोग करतो? त्याची काळजी घेतली जाते का? उलट नको ते बघणं आणि टि.व्ही., मोबाईल, संगणकाचा वापर करून डोळयाची वाट लावून घेणें, धुळ, प्रदुषित हवा, उन्हातून फिरणे... अशी बरीच मोठी यादी असेल.  निसर्गाने डोळे कशासाठी दिलेत? सौंदर्य, सृजनशिलता जपणे इतरांचे कौतुक करण्यासाठी. दैनंदिन आयुष्यात अशा अनेक घटना असतात ज्या डोळ्याला आणि मनाला समाधान देतात. लिखाण, वाचन, वर्णन, खेळ, चित्रे, जुन्या किल्ल्यांची परंपरा, ऐतिहासिक ठिकाणे, जंगल सफारी, धरणे, देव-देवळांची घडणावळ, शिल्पे, आश्चर्यकारक ठिकाणे इत्यादी बघण्यात आयुष्य संपेल पण सौंदर्य संपणार नाही. आपल्या अवतीभवती छोट्या - मोठ्या गोष्टीत सौंदर्य एवढे ओतप्रोत भरलेले असते फक्त ती बघण्याची दृष्टी आपल्याकडे हवी. चांगल्या दृष्टीची जोपासणी काळजीपूर्वक करावी लागते.

          माझ्या कार्यालयातील अंध भगिनी नेहा पावसकर या कार्यालय सांभाळून ॲथलेटिक्स, बुध्दीबळ, गिर्यारोहण क्षेत्रातील तज्ञ आहे.  तिने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेतला असून तिला अर्जून पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.  तिने “आयेशा” संस्थेची स्थापना करून अनेकांच्या जीवनात प्रकाश निर्माण केलेला आहे.

           "डोळयाचे पारणे फिटणे" असा एक वाक्यप्रचार आहे. सुंदर कलाकृती बघुन, नैसर्गिक सौंदर्य बघून, मुलांचे यश बघून आईवडिलांच्या डोळयाचे पारणे फिटते असे म्हणतात. अशा हया देणगीचा उपयोग आपण मरणोपरांतसुद्धा दुसऱ्यांना करून देऊ शकतो. फक्त इच्छाशक्ती हवी.  ती नक्कीच सगळयाना असू दे ही देवाकडे प्रार्थना होय.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव