ज्योतिषशास्त्र- एक कुतूहल
योगायोगाने अनपेक्षित लाभ मिळाल्यावर अनेकजणांना आनंद होतो आणि ते त्याची कारणमिमांसा न करता उपभोग घेतात. अपयश आणि दु:ख आल्यावर विशेषत: सर्व मानवी प्रयत्न थकल्यावर व कोणताही मार्ग सापडत नाही असे वाटते तेव्हा त्यांना ज्योतिषशास्त्राचा आधार घ्यावासा वाटतो. अगदी सुशिक्षित लोकसुध्दा ज्योतिष्याचा सल्ला घेतात. ज्या क्षेत्रात स्थैर्य, स्पर्धा, गुंतवणूक किंवा राजकिय हित संबध असणा-या व्यक्तींना या शास्त्रावर बहुधा विश्वास असतो. त्यासाठी ते विविध अंगठ्या, ठराविक अंक किंवा अक्षर, दिवस यांचा मेळ घालून निर्णय घेतात.
मुळात ज्योतिषशास्त्र म्हणजे काय? मनुष्य जन्माच्या वेळी ग्रह-ता-यांचे
विशिष्ट ठिकाणी असणे, त्यांची युती, स्थलांतर, हस्तरेषा, काळ-वेळ याची दर्शविणारी पत्रिका किंवा कुंडली. यामधील माहितीत काही सुक्ष्म फरक पडला तरी चुकीचे
अनुमान येऊ शकते. या शास्त्राचा सखोल अभ्यास, निरीक्षण आणि आडाखे योग्य असल्यास एक
उत्तम मार्गदर्शन मिळू शकते. ज्योतिष शास्त्रावर विश्वास का बसतो त्याचे कारण पुर्वीच्या
काळी भविष्य काळातील अनुमानासाठी वैज्ञानिक साधन उपलब्ध नव्हते. अशा वेळी एखाद्याचे
अनुमान एखाद्या बाबतीत शक्यतेच्या कसोटीवर (Probability) खरे ठरायचे आणि इतर जणांचा
त्या ज्योतिष्यावर विश्वास बसायचा.
सर्वसाधारणपणे विवाह जुळविताना दोघांच्या
पत्रिकेतील गुणांचा मेळ घालून संमती घेतली जाते. पत्रिका जुळत नसल्यास सहसा विवाह करत
नाहीत. मंगळ, राहू, केतू यांचा विशिष्ट स्थानातील अडसर जोडी जमविण्यास अडचणीचे ठरते.
मग काय करायचे? वक्र ग्रहांची शांती केल्यास
थोडीफार सुटका होऊ शकते असे त्यांचे म्हणणे असते.
नाईलाजाने का होईना लोक तयार होतात.
वैज्ञानिक युगात ज्योतिषशास्त्रावर कितपत
विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतू मला पडणारे काही प्रश्न
असे आहेत.
1.
नैसर्गिक आपत्ती (भूकंप, सुनामी, अतिवृष्टी) मध्ये
हजारो लोक बाधित होतात तेव्हा त्यांची पत्रिका सारखी असते का व कोणी ज्योतिष जाणणारा
त्याची पुर्व सुचना का देत नाही?
2.
इतर धर्मियात या शास्त्राचा आधार घेतला जात नाही,
तेव्हा त्यांचे नुकसान होत नाही का?
3.
ज्यांचा ज्योतिषावर
विश्वास आहे व त्यानुसार केलेल्या कामकाजात अडचणी येत नाहीत का?
4.
ज्याचे पत्रिकेमधील
गुण जुळूनही लग्न टिकत नाही त्यांच्या बद्दल काय?
5.
विमान दुर्घटना, पाणबुडी
नाहीशी होणे, हरविलेली माणसे कोठे आहेत हे कोणी तज्ञ ज्योतिषी ठामपणे सांगू शकतो का?
Comments
Post a Comment