आजीव विद्यार्थी
आम्हाला शाळेत नेहमी सांगायचे तुम्ही मनाशी एक प्रतिज्ञा करा. “जितके दिवस जगेन तितके दिवस शिकेन” त्यावेळी आम्हाला कळत नव्हते पण आज पटते आहे व त्याचे महत्वही जाणवते. आयुष्यसुद्धा एक शाळाच आहे. आपण सर्व जण आजन्म विद्यार्थी असतो. जगण्यातला प्रत्येक क्षण माणसाला काहीना काही शिकवत असतो. त्यातून कीती बोध घेतो ते आपल्यावर असते. मुख्य म्हणजे शिकण्याची वृत्ती माणसाला नम्र बनविते. नवीन नवीन शिकण्याची ओढ माणसाला कधी कधी माणसाला एवढ्या उच्च पातळीवर नेवून ठेवते की सगळेजण बघतच रहातात. जिज्ञासा माणसाला गप्प बसू देत नाही. शालेय शिक्षण, विद्यालयीन शिक्षण हे तर पाया घट्ट करते, पुढे प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक वळणे येतात तेव्हा परिस्थिती माणसाला शहाणपणा शिकवते. फसवणूक झाल्यानंतर व्यवहाराचे महत्व पटते. निसर्ग हा एक महान शिक्षक आहे त्याच्याकडून आपण समानता, दातृत्व, कणखरपणा, विविधता आणि प्रेमसुद्धा शिकू शकतो.
नवीन नौकरी लागली तेव्हा मुलाखत झाल्यावर साहेबाने आयुष्यातला पहिला धडा (वयाच्या 20 वर्षी) शिकवला की, कोणतेही काम लहान नसते. आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन लहान असतो. छोट्या छोट्या कामातूनसुद्धा खूप काही शिकायला मिळते. एकाने सांगितले की तुम्ही “स्क्रू” सारखे स्वत:ला तयार ठेवा. कोणत्याही जागी पक्का बसला पाहिजे, ज्याच्यावर सगळी यंत्रणा अवलंबून असते.
वैयक्तिक, सामाजिक व सार्वजनिक आयुष्यात हा शिकण्याचा गुण लोकप्रिय बनवितो म्हणून “शिक्षक सर्वत्र पूज्यते” असे म्हणतात ते उगीच नाही. आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या मदतीने तर कोणतेही शिक्षण अधिक सोपे करून ठेवले आहे. वेगवेगळ्या मार्गाने पारंपारिक किंवा अपारंपारिक पध्दतीने शिक्षण अनेक प्रकारे घेता येऊ शकते. फक्त आपली इच्छा आणि मेहनत करण्याची तयारी हवी.
योग्य मार्गदर्शन मिळाल्यावर माणूस त्या त्या क्षेत्रात पारंगत होतो आणि ही परंपरा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करावा.
Comments
Post a Comment