अविस्मरणीय भाऊबीज
साधारण 40-42 वर्षांपुर्वीची गोष्ट,
नांदेडहून मुंबईला येण्यासाठी रात्री 1 वाजता गाडीत आम्ही तिघेजण चढणार होतो. नेहमी प्रमाणे मी पुढे, मागे आई व तिच्या मागे बाबा
अशा क्रमाने, पण काय झाले ते कळले नाही. (कदाचित गर्दी असावी ) मी गाडीत चढले, आई-बाबा
खालीच राहीले आणि गाडी सुटली. रात्रीची वेळ होती. गाडीत सगळे झोपलेले (फक्त तिकीट चेकर
तेवढा जागा असतो) काय करावे ते कळेना. तेवढ्यात कोणीतरी गाडीची साखळी खेचून गाडी थांबवली.
माझा डबा स्टेशन सोडून पुढे गेला होता. आई-बाबा कदाचित शेवटच्या डब्यात चढले असतील.
इकडे मला मात्र खुप भिती वाटली. तेवढ्यात तिस-या बर्थवरून एक व्यक्ती खाली उतरली,
“ ताई, तु काळजी करू नकोस. तुला भेटतील आई-बाबा”. 15 मिनिटाच्या अंतरावर दुसरे स्टेशन
आले व आई-बाबा मला भेटले. तेवढ्यात हा माणूस पटकन खाली उतरुन निघून पण गेला. जाताना
मात्र एवढेच म्हणाला. ताई, आजच माझी भाऊबीज झाली !
10-12 वर्षाच्या मुलीला काय कळत
होते !. पण जेव्हा कळायला लागले तेव्हा केवढ्या मोठ्या संकटातून आपण वाचलो, तेही कोण
कसा धाऊन आला काही कळलेच नाही. मात्र हे चार शब्द मला केवढे धीराचे वाटले आणि मला एक
अज्ञात भाऊ देऊन गेला.
आजही तो प्रसंग मला आठवतो आणि त्या
माझ्या भावाला “सुखी ठेव” एवढीच मी प्रार्थना करू शकते. काही जण अचानक भेटतात आणि त्यांच्यासाठी
मनाचा एक कोपरा कायम आठवणीत रहातो. असेच भाऊ वेळोवेळी सगळ्यांना संकटसमयी मिळोत आणि
सर्वजण कायम सुरक्षित
रहावेत अशी प्रार्थना.
आज आपण अत्याचाराच्या अनेक घटना
ऐकतो तेव्हा मानसिक त्रास खुप होतो. त्यासाठीच मला वाटते, मुलांना जास्त जपावे. नको
त्या वयात सध्या मुलांना नको त्या गोष्टी पहायला मिळतात. त्यांच्या कोवळ्या मनावर त्याचा
काय परिणाम होईल याचा विचार न केलेला बरा. दुसरीकडे स्त्रियांबद्द्लचा दृष्टीकोन. शाळेत असल्यापासून आपण सगळेजण प्रतिज्ञा करतो, बंधू-भाव
पाळूया म्हणून मात्र गांभीर्याने किती जण पाळतात? मुलींनी शारिरीक रित्या व मानसिकरीत्या
सक्षम होण्याची काळाची गरज आहे.
भारत महासत्ता होत असताना सामाजिक विकास
घडणे ही तेवढेच आवश्यक आहे हे सगळ्यांनीच लक्षात घेणे आवश्यक आहे.
Comments
Post a Comment