आई आजची आणि कालची
आई ही आई असते. तिची तुलनाच होऊ शकत नाही. तिचा अभ्यास करण्यांत आयुष्य संपेल पण तरी अभ्यास पूर्ण नाही होणार! आईबद्दल एकदां परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न आला होता. आई मुलांपेक्षा नेहमीं, मोठी असते, सुंदर असते, अनुभवी असते. मला सगळें पर्याय योग्य वाटतात. २५ वर्षापुर्वीची आई आणि आताच्या आईमध्ये तसा बराच फरक पडलाय. उच्च शिक्षण, कौटुंबिक आधार, प्रोत्साहन आणि कमावण्यास लागल्यामुळें आजची आई नक्कीच स्थिरावलेली आहे. मुलांबाबत जास्त आग्रहीपण झाली आहे.
सामाजिक स्थित्यंतराचे अनेक तोटे सहन करून दोन्ही आघाडय़ांवर धाऊन तिची दमछाक होते. त्यांत नवऱ्याची साथ असो अगर नसो, सगळयाना सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. आजची आई आर्थिक पाठबळ असल्यामूळे काही
डोळस निर्णय घेऊ शकते, जी पुर्वी पुर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून होती. शिक्षण आणि नौकरीमूळे लग्न उशीरा होतात. उशीरा लग्न झाल्यामूळे परिपक्वता आणि जबाबदारी पेलण्याची क्षमता उत्तमरीत्या असू शकते. आई समोर अनेक पर्याय असतात, कोणत्याही परिस्थितीत ती आईच असते. तिच्या मातृत्वाला कोणी आव्हान देऊ शकत नाही. भाषा, परिस्थिती, पोषाख आणि स्वभाव बदलला तरी आई ही आईच असते. आई ही कालातीत आहे आणि मुलांसाठी आदर्श असते.
एकमात्र आजच्या आईबद्दल सांगता येईल ती
मुलांना मुलांच्या भविष्याच्या किंवा करीयरच्या दृष्टीकोनातून स्वत: पासून
प्रयत्नपूर्वक दुर ठेऊ शकते. भलेही मनात अश्रू गाळत असेल परंतू तिच्या हिताच्या आड
येईल असा कोणताही निर्णय ती स्वत: घेत नाही. तरीही मुलांवरचे संस्कार व स्वातंत्र
हे दोन अधिकार तिने स्वत: कडे राखून ठेवले आहेत आणि ते ती जीवापाड जपते. “No
matter what my Age is, I will always need my Mom” आताच आलेला मुलीचा संदेश
खुप काही सांगून गेला.
पुर्वी जशी शिवाजीची आई होती तशी श्यामची आई पण होती. दोघांनी मुलांना घडवले पण वेगवेगळ्या प्रकारे. तीच भूमिका आताच्या आईमध्येपण असते. फरक फक्त विचारांचा आणि परिस्थितीचा असतो. प्रसंगी सामाजिक विरोध पत्करूनसुद्धा ती मुलांच्या मागे ठामपणे उभी रहाते. त्रास नको म्हणून काही जण मातृत्व टाळतात पण आधुनिक विज्ञान आणि दत्तक विधान त्यांना मातृत्वाचा आनंद घेवू शकतात. अशा कालच्या, आजच्या आईला माझा प्रणाम.
Comments
Post a Comment