आत्मनिर्भरता
शिवरायांची एक शिकवण आहे “राज्य छोटे का असेना, स्वत:चे असावे”.
आज देशात सर्वत्र “आत्मनिर्भर बना” हा परवलीचा शब्द झालेला आहे. आत्मनिर्भरता जशी देशाला लागू आहे तशीच ती व्यक्तिलाही लागू आहे. आत्मनिर्भर होणे म्हणजे “स्वावलंबी होणे”
खरंच आत्मनिर्भता 100% होणे शक्य आहे का? विशेष करून जग हे एक “बाजारपेठ” म्हणून संकल्पना राबविण्याची ठरविल्यावर!
इतर देशांवर अवलंबून रहाणे काही प्रमाणात कमी होवू शकते परंतू संपूर्णपणे शक्य नाही. सगळे काही इथेच बनविणे जसे शक्य नाही तसेच सर्वकाही बाहेरून विकत आणून संसार किंवा देश चालविणे हे ही शक्य नाही.
आपल्याकडे असलेल्या साधनसामूग्रीचा जास्तीत जास्त उपयोग आणि गरज निर्माण करणे हे ही तेवढेच आवश्यक आहे. तसेच जिथे आपण कमी पडतो तिथे दुस-यांची तात्पुरती मदत घेणे आणि सक्षम होण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारी जिद्द, मेहनत, देशाभिमान आणि व्यक्तीसाठी स्वाभिमान जोपासणे आवश्यक आहे.
आज पुढची पिढी बुध्दीमत्तेचा वापर करून परदेशात मोठया मोठ्या पदावर कार्यरत राहून त्यादेशाचे भले होते. स्वत:च्या देशासाठी का नाही ? कारण हवे तेवढे प्रोत्साहन, उच्च शिक्षण आणि देश सहकार्य करीत नाही. म्हणून परदेशाचे आकर्षण वाटते.
“Brain Drain” होते याकडे कोणाचेच लक्ष जात नाही किंवा थांबवण्याचा प्रयत्न केला जात नाही. आपण कुठे तरी कमी पडतो का? कष्ट करून त्याचे चीज होत नाही असा युवकांचा समज होत
आहे का? असे कोणते परदेशाचे आकर्षण देश, स्वत:चे माणसे सोडायला भाग पाडला जातो? हा विचार कोणाच्याच मनात येत नाही का?
मग याचेच गोंडस नाव “आत्मनिर्भर” म्हणायचे का? जाणारे जातील व राहणारे राहतील अशी तटस्थ भूमिका घेणे योग्य आहे का? आणि असली तर अशी भूमिका फलदायी ठरेल का? स्वत:चा स्वत:च्याकर्तृत्वावर विश्वास असणे आणि तसे प्रामाणिक प्रयत्न करणे हे प्रत्येकाचे प्राथमिक कर्तव्य असते. असंख्य परवाने, जटील कायदे, अपारदर्शकता यामूळे सामान्य माणसे मोठे काही कर्तृत्व दाखवयाला इच्छुक नसतात किंवा तशी परिस्थिती पोषक नसते. खाजगीकरण व मुक्त अर्थव्यवस्था यांचे जे फायदे किंवा तोटे आहेत या दोन्हींचा गैरफायदा घेतला जातो. राजकीय हस्तक्षेप आणि अयोग्य लाभार्थी यांच्यामूळे अर्थव्यवस्थेवर अनिष्ट परिणाम होतात. सामान्य जनता या सर्वात भरडली जाते. मग कसली आत्मनिर्भरता व काय?
Comments
Post a Comment