छंदोपासना
उपासना म्हणजे चित्त एकाग्र करणें. आवडीचं काम मग ते कोणत्याही प्रकारचे असले तरी त्यात आनंद मिळतो. आपोआप आवडीचे काम मनापासून केले जाते. छंद नेमके हेच करतो. या छंदांबद्दल लिहावे तेवढे कमीच होईल. प्रत्येकास वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतात आणि हे छंद प्रत्येकाने आवर्जून जपावेत. जेणेकरून मनाला विरंगुळा मिळेल. मन प्रसन्न होईल, दु:खाचा विसर पडेल. लहानपणीपासून एखादा छंद असतो. कधी कधी काळानुसार छंद बदलतो. प्रत्येकाला किमान एक तरी छंद असावा. वयानुसार परिस्थितीत कधीं व कसे बदल होतील ते सांगता येत नाही. कंटाळा घालवायचा आणि एक नवीन ऊर्जा निर्माण करायचे काम छंद करतात.
माझ्या बहिणीच्या सासूबाईनी वयाच्या 60 व्या वर्षी भरतकाम करून चादरी तयार केल्या. जवळपास 50 एक तरी चादरी झाल्या असतील. त्यांनी नातेवाईकांना चादर भेट म्हणून दिली. ती आज एक आठवण आणि त्यांची कला म्हणून एक ठेव तयार झाली शिवाय त्यांचे म्हातारपण सुखात गेले आणि मनही रमले. कधी कधी हा छंद व्यवसाय म्हणून अर्थार्जन करण्यास उपयोगी पडतो.
बायकांना विशेष आवडीचे छंद असतात. एकदा संसारात पडल्यावर त्या सगळे काही विसरूनच जातात. लहान मुले, त्यांची शाळा, कॉलेज, नोकरीं, पाहुणेमंडळी इत्यादी त्यांना वेळच मिळत नाही तरी वेळात वेळ काढून आपापले छंद मुद्दाम जपणे आवश्यक आहे.
जेणेकरुन पुढे मुले मोठे झाल्यावर दुसरीकडे जातात किंवा त्याचे स्वत:चे विश्व तयार होते त्यावेळी छंद हा मनाला एक विरंगुळा होईल. निवृत्ती नंतर आपल्याला छंद उपयोगी पडतात. वेळ आणि मन दोन्ही गुंतल्यामूळे पुढे घरच्यांना, नातेवाईकांना व मित्रांनासुद्धा मदत होते. “हा छंद जिवाला लावि पिसे” म्हटले ते खरे आहे. या छंदामूळे
काही गोष्टी आवर्जून सांगितल्या जातात, बघितल्या जातात, फिरणे, गाणे, वाद्य वाजविणे, चित्रकला, वाचन, लिखाण यामूळे स्वत:बरोबर दुस-यांना आनंद व समाधान देतात. आणखीन काय हवे असते माणसाला? सध्याच्या करोनाच्या काळात घरात असताना छंदोपासनेमुळेच ब-याच जणांनी स्वत:ला व
कुटूंबाला सावरले.
Comments
Post a Comment