भावतरंगची जन्म कथा
दि. 16 मे, 2021 रोजी “भावतरंग”
ई-बुक स्वरुपात प्रसिध्द झाले, त्याची ही मुळ कथा. खरे तर गेले 10-15 वर्ष मी लिहित आहे. मधून मधून वर्तमानपत्रे, मासिके आणि समाजाच्या पुस्तकात मी माझे लेख प्रसिध्द
करण्यासाठी पाठवत असे. मात्र एवढे 105 लेखांचे पुस्तक होईल असे वाटले नव्हते.
म्हणतात ना “हम लिखते गये और किताब बनती गयी” या धर्तीवर, वाचकांसाठी आज एक
कायमस्वरुपी ठेवा उपलब्ध करण्याचा एक प्रयत्न केला याचा मला आनंद होत आहे.
पुस्तक छापण्यामागे माझे बहिण-भाऊ, पती आणि इतर सर्वजण माझ्यापेक्षा जास्त उत्सुक होते. खरंतर गेल्या वर्षी प्रकाशकाकडे पुस्तकस्वरुपात छापण्यासाठी लिखितस्वरूपात दिलेले होते. परंतू कोविडजन्य परिस्थितीमूळे छापणे शक्य झाले नाही. अन्यथा मागच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रकाशित झाले असते. पण म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ यावी लागते, तेच याही बाबतीत खरे झाले. पहिल्यांदा मला वाईट वाटले, काही तरी करावयास गेले आणि अनपेक्षितरीत्या सर्वच काम ठप्प झाले. कधी नाही ते 54 वर्षातली लॉकडाऊनची भयाण शांतता जीव कासावीस करुन गेली. तेव्हाही लिहीतच होते परंतू पुस्तकाचा विचार काही डोक्यातून जात नव्हता. एकदा असेच ह्यांनी लेखांचे एक “ई-बुक” का काढत नाही, असे विचारले. तो पर्यंत मला “ई-बुक” जास्त माहिती नव्हती. तोपर्यंत डिसेंबर, 20 उजाडला होता. त्यानंतर कोविड अनलॉक प्रकियेमूळे कामाचे प्रचंड ओझे डोक्यावर होते. त्यामूळे पुस्तकाचा विचार थोडा बाजूला पडला. एपिल, 2021 नंतर पुन्हा या विषयाकडे वळून रात्रंदिवस एक करून एकदाचे 25 एप्रिल, 2021 रोजी प्रारूप खाजगी स्वरुपात प्रसिध्द झाले. त्यानंतरच्या आलेल्या सुचना, मुखपृष्ठ सजावट, लेखनातील दुरुस्ती व सुधारणा, वाक्यरचना, सजावट ... बापरे, हुश्श ! या सगळ्या जबाबदा-या कुटूंबातील सगळ्यांनी वाटून घेतल्यामूळे सोपे झाले. छापील स्वरुपात का नाही हा प्रश्न जिव्हाळ्याचा होता. कशीबशी समजूत घालून स्वत:ला व इतरांना ई-बुक साठी तयार करण्यांत आले.
डॉक्टर आणि स्त्री या दोघांच्या दृष्टीकोनातून बाळंतपण सोपे नसते असे म्हणतात. त्याची प्रचिती या निमित्याने तिस-यांदा आली (आधीच्या 2 मुलीचे बाळंतपण यापेक्षा मला सोपे वाटले). नवोदित लेखकांची कवीच्या दु:खाची कल्पना मला या निमित्याने आली. त्यात परत एवढे मेहनत करून कोणी वाचलेच नाही तर ही धाकधूक होतीच आणि अजूनही आहे. फेसबुक वरील अनेक उस्फुर्त प्रतिक्रियांमूळे मनाला धीर आला. विशेषत: मराठी संवर्धन मंडळावरील वाचकांची पसंती बघून हुरूप आला आणि पाऊल योग्य ठिकाणी पडत आहे याची खात्री पटली.
सदर मराठीतील लेख वैचारिक स्वरुपाचे असून वाचकांचा प्रतिसाद मिळून पुढील पिढींसाठी मार्गदर्शक ठरतील अशी अपेक्षा आहे. कोणतेही बदल एकदम घडत नसतात हळूहळू तशी परिस्थिती, मन:स्थिती घडवावी लागते. काही प्रमाणात हे काम लेखणीद्वारे करता येते म्हणून हा लेखन-प्रपंच गोड मानून प्रोत्साहित करावा , अशी विनंती आहे.
Comments
Post a Comment