अन्नदाता सुखी भव
लहानपणी आम्ही सर्वजण जेवायला एकत्र बसत असू तेव्हा न चुकता सुरुवातीला "वदनी कवळ घेता" आणि उठताना “अन्नदाता सुखी भव" असे म्हटल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटायचे नाही. त्यामागे केवढा उदात्त हेतू दडला होता ते नंतर मोठे झाल्यावर कळले. अन्न धान्य पिकवण्यापसून ते आपल्या ताटात आपल्या खाण्यायोग्य होईपर्यंत किती जणांची मेहनत असते याची जाणीव सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे. वेळच्यावेळी खायला मिळणे आणि आपल्या सुदृढ आरोग्यासाठी सकस अन्न ही मूलभूत गरज आहे. तिचा आपण मान राखलाच पाहिजे. म्हणूनच “खावून माजावे पण टाकून माजू नये” असे म्हणतात ते उगीच नाही.
पूर्वी जेवणाच्या पंगती उठत तेव्हा अन्नाची नासाडी होत नसे.
आता जेवणाच्या बुफे प्रकारात (आवश्यक तेवढे घेऊन खावे हा हेतू असताना) खूप अन्न वाया घालवतात. मला नेहमी तिथे एक फलक लावावा असे वाटते. “कृपा करुन पोटभर खा, अन्न वाया घालवू नका”. जगात अनेक जण असे आहे जे उपाशी किंवा अर्धपोटी आहेत. त्याला वाया जाणारे अन्न हे जबाबदार असते.
यामुळे असंतोष निर्माण होतो, गुन्हेगारी वाढते, रोगराई पसरते. उरलेले अन्न वाया घालवण्यापेक्षा अन्नदान करणे गरजेचे आहे.
गृहिणीचे स्वास्थ्य अन्नावर अवलंबून असते. ती कुटूंबाला खाऊ घालते.
स्वत:च्याखाण्याकडे दुर्लक्ष करते. स्वत: अन्न शिजवून कधीही पोटभर जेवणार नाही किंवा उरलेले सुरलेले खाऊन अनेकदा आजारी पडते. म्हणूनच तिच्या स्वास्थाकडे इतरांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
आपल्या संस्कृतीत अन्नदानाला खूप
महत्व आहे. पुर्वी गरीब विद्यार्थी शिक्षण घेताना वार लावून जेवत असत. तसेच देवळात
काही प्रसंगात शिधा देणे अशी प्रथा अजूनही काही ठिकाणी चालू आहे. अक्षयपात्र
म्हणून एक संस्था गरीब मुलांसाठी अन्नदान किंवा भोजनाची व्यवस्था करीत असते. अशा अनेक संस्था महाप्रसाद, भोजन आणि अन्नदान
करीत असते त्यामागे “भूकेले कोणी राहू नये” हीच भावना असावी.
जय जवान व जय किसान या ना-याबरोबर नवीन वर्षाच्या सुरवातीला घरातल्या लक्ष्मीला “अन्नदाता सुखी भव” असे म्हणूया.
Comments
Post a Comment