पुरूषसुक्त
दि. 19 नोव्हेंबर, 2020 रोजी “जागतिक पुरूष दिन” असतो. तु एवढे लिखाण करतेस, “माझ्या बद्दल कधी लिहीणार?” इति नवरोजी म्हणत असायचे म्हणून आज ठरविले की समस्त पुरूषवर्ग़ाबद्दल लिहायचे.
ॲडम आणि इव्हची गोष्ट सर्वश्रूत
आहे. निसर्गनिर्मित दोन आश्चर्य म्हणजे स्त्री आणि पुरूष हे
परस्परपुरक आणि सृष्टीचक्र सांभाळून पुढे न्यायला निर्माण केलेली समर्थ
मानवी जात म्हटले तर परस्पर विरोधी व म्हटले
तर एकमेकांना पुरक, एकमेकांचे
पटत नाही पण एकमेकांशिवाय करमत नाही. समृध्द आणि सक्षम आयुष्य
जगण्यासाठी त्याच्या शिवाय ती आणि तिच्या शिवाय तो अपूर्ण असतो.
आपल्या आयुष्यात येणारे
अनेक पुरूष बघत आपण मोठे होत असतो. किंबहुना पुरूषाला पहातच स्त्री
मोठी होत असते, अधिकाअधिक सक्षम होत असते आणि एक दिवस तिला तिचा
हक्काचा पुरूष मिळतो. त्याच्या बरोबर ती अनेक स्वप्न पहाते,
पूर्ण करते आणि जीवन प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न करते. कमी अधिक प्रमाणात हेच अनेकांच्या आयुष्यात घडत असते. काही अपवाद असतात, ते खालीलप्रमाणे:-
1) आई व बहिणीसाठी अविवाहीत रहाणारे.
2) मनासारखी /खा मिळाली नाही म्हणून एकटे रहाणारे.
3) बायकोच्या पश्चात मुलांना सर्वस्व मानून एकटे रहाणारे.
4) “करेल तर अमुकच पाहिजे” नाहीतर कुणीच नको.
5) आई-वडिलांची सेवा करायला म्हणून एकटे रहाणारे.
6) काही विशिष्ट ध्येय बाळगून किंवा भावनाशील व्यक्तिमत्व असलेले व त्यासाठी स्वेच्छेने
एकटे रहाणारे.
7) नाईलाज किंवा परिस्थिती अनकुल नसल्यामूळे.
या व्यतिरीक्त सर्वजण परिस्थितीशी
तडजोड करून एकत्र रहाण्याचा प्रयत्न करतात. हल्ली सामाजिक माध्यमामुळे
बरीच चर्चा, कविता, उहापोह व विचारमंथन
होते. त्यानुसार बरेच जण “गरीब बिच्चारे
पुरूष” काळजीवाहू, सोशिक, भावनाप्रधान नसणारा, प्रेमळ, मायाळू,
वरुन कडक पण आतून भावनाशील, कर्तव्यतत्पर, समजूतदार आणि सामर्थ्यवान अशी पुरूषांची
प्रतिमा रंगविलेली दिसते. हे सत्य आहे का? परिस्थितीनुसार माणूस बदलतो.
आताच्या धकाधकीच्या, समानतेच्या युगात पुरूषाची
जबाबदारी जास्तच वाढली आहे. अनेक आकर्षणे, प्रलोभने अवतीभोवती असताना स्वत:ला व इतरांना सांभाळणे किती कठीण होत असेल?
एकत्र कुटूंबपध्दतीत बायको आणि
आई यांच्यात किती भरडला जात असेल? विभक्त कुटूंब पध्दतीत पूर्णच जबाबदारी सांभाळावी लागते. मग किती ताण तणाव व व्यवस्थापन करावे लागत असेल? बायको आणि मुले यांच्यातील मतभेदात
किंवा स्वत:च्याआणि बायकोच्या विचारसरणीत कशी तडजोड करीत असेल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे कालातीत असतात.
शालेय शिक्षणापासून मुलांवर
नैतिक जबाबदारी समजावून सांगितल्यास कदाचित काही समस्या सुटू शकतात. त्यासाठी “ MENS ARE ON MARS AND WOMENS ARE ON VENUS” या पुस्तकाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात किंवा कॉलेजमध्ये करण्यात यावा असे
वाटते. पुरूषांना योग्य
वेळी, योग्य वयात, योग्य मार्गदर्शन केल्यास
अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकते. अवाजवी अपेक्षा न ठेवता एक माणूस म्हणून विचार केल्यास सर्व काही सुरळीत होऊ
शकते.
पुढच्या पिढीची जबाबदारी
आणखीनच वाढणार आहे कारण संस्कार करण्यासाठी वेळ नाही. वेळ असला
तरी इच्छा नाही, वेळ
नाही म्हणून मूल नको. मुल नको म्हणून जे काही आहे ते आपण उपभोगायचे आणि मजेत रहायचे. ही विचारसरणी दिवसेंदिवस वाढत आहे.
करीअर, पैसा आणि भविष्याची काळजी नसल्यामूळे एक
प्रकारचा बेजाबदारपणा वाढत आहे ही काळजी करण्याची बाब आहे. वेळीच यावर उपाय केला नाहीतर हळूहळू
मानवजात कमी होण्याची दाट शक्यता आहे. परत निसर्गाला दखल घ्यावयाची
वेळ येईल. तसेच ही जबाबदारी आई-वडील,
समाज आणि देश सगळ्यांची आहे.
Comments
Post a Comment