मित्रांगण

            मित्र आणि त्यांचे अनेक ग्रुप्स या सर्वांना मिळून मैत्रांगण असे नाव द्यायला हरकत नाही. बालपणीचे, कॉलेजचे, ऑफिसमधले, दैंनंदिन प्रवासातले, सामाजिक माध्यमावरचे असे अनेक ग्रुप असतात. विविध क्षेत्रातले प्रत्येक जण वेगळा.  प्रत्येकाला एकमेकांबद्दल वाटणारी ओढ प्रत्यक्ष न भेटताही मैत्रीचे स्नेहाचे चौकशीचे नाते कधी फुलत जाते ते कळत नाही. काही दिवसांनी याची सवय होऊन जाते.

            अचानक काही तरी संदर्भ लागतो आणि आपल्याला त्यांचे वेगळेपण दिसून येते. त्यात इर्षा किंवा आगळिक अशी नसते त्यांच्या कर्तृत्वाने भारावून जायला होते. मित्र-मैत्रिणींनी अंगण कायम भरलेले असावे असे वाटते परंतू असे नेहमी शक्य नसते. विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत.  सामाजिक माध्यमांमूळे अगदी वयाच्या 50व्या वर्षीपण वाढदिवसाला एकत्र भेटणारे आहेत. ठरवून योजना आखून आश्चर्यचकीत करणारे, दुस-यांच्या आनंदात स्वत: आनंद शोधणारे, एकमेकांची दु:खे जाणून घेणारे त्याच्यांवर फुंकर किंवा उपाय सुचविणारे. अवगुणांचे गुणात रुपांतर करणारे, माझ्याकडे नसले तरी एकमेकांच्या मदतीने वेळ निभावून नेणारे असे अनेक मित्र-मैत्रिणी अनेक रूपाने भेटत असतात फक्त आपली इच्छा हवी. मैत्री करणे आणि निभावणे ज्याला जमले तो आयुष्यात नक्की यशस्वी होतो. किंबहुना काही वेळा मित्र यशाचे भागिदार असतात. माणसाच्या काही भावनिक गरजा असतात  त्यासाठी मैत्रीची स्पेस अत्यंत आवश्यक असते.

           आपण वाईट परिस्थितीतून जात असताना मित्र किंवा मैत्रिणीचे  “मी आहे ना” एवढे शब्द संजीवनी सारखे काम करतात. अशा कामास येणा-या मित्र-मैत्रिणीला कधी विसरू नका. त्यांना जपा. हे तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरूण रहाल आणि इतरांना हवे हवेसे वाटाल. वरचेवर मित्राच्या संपर्कात रहा.  कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त भेटायला किंवा आवडती व्यक्ती म्हणून एकत्र येणे हे मैत्रीतच घडू शकते. कोणतेही बंधन नसलेली आपल्या इच्छेवर अवलंबून असलेली ही एक देणगी समजून तिचा आदर करा.  

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव