तिळाचे महात्म्य आणि संक्रांत
नुकताच संक्रांतीचा सण झाला आणि सगळ्यांना तिळाची आठवण झाली. एरवी दुर्लक्षित असलेली ही मसाल्यातील वस्तू या सणात खूप भाव खाऊन जाते. तिळापासून दागिने, लाडू, चिक्की, रेवडी, वड्या व तिळगूळ पोळी बनवतात. याचा जुळा भाऊ “काळा तीळ” असतो तो दुर्लक्षित आहे. कोकणात या तिळालासुद्धा महत्व आहे. धार्मिक कार्यात व श्राध्द प्रसंगी काळे तीळच लागतात. तिळाचे पीक व्यापारी तत्वावर घेतले जाते. कॅल्शियम, प्रोटीन, मॅग्नेशिअम अशाने युक्त असलेले तिळाचे आयुर्वेदिक औषधात आहेत. सांधेदुखी व मसाजसाठी तिळतेलाचा मुद्दाम वापर करतात. भाकरीला किंवा पराठ्यांना तीळ लावून भाजले की वेगळीच चव येते. तिळाची चटणीसुद्धा आरोग्यदायी असते. नुसते तीळ भाजून खाल्ले तरी थंडीत उबदारपणा येतो. आपल्या सामाजिक, सांस्कृतिक जीवन समृध्द करण्यासाठी “तीळ” या शब्दावर आधारित अनेक म्हणी आहेत. त्यावरून तुमच्या लक्षात येईल तिळाचे महात्म्य. तीळ या शब्दाचा प्रत्येक म्हणीत अर्थ वेगवेगळा आहे. तुम्हाला आणखी आठवतात का बघा.
1) जीव तीळ तीळ तुटतो. -
काळजी वाटते.
2) तोंडात तीळ भिजत नाही. - गुपित राखून ठेवता येत नाही.
3) तिळा तिळा दार उघड - अकल्पित ठेवा सापडणे
4) एक तीळ 7 जणांनी वाटून खाणे - सगळ्यांनी मिळून मिसळून रहावे किंवा वाटून खाणे.
5) तिळा तिळाने तीची वाढ झाली. - हळूहळू प्रगती झाली.
6) तिळगुळ घ्या गोड गोड बोला - प्रेमाने देवाणघेवाण करा किंवा एकमेकाशी प्रेमाने वागा.
अशा अनेक अंगाने तिळाचे महात्म्य संक्रातीमध्ये असते. वैज्ञानिकदृष्ट्या मकर संक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. इंग्रजी वर्षातला पहिला सण तिथीनुसार न येता ठराविक म्हणजे जानेवारी महिन्यात हिंदू पंचागानुसार पौष महिन्यात येतो. मुले व स्त्रियांना दागिने घालून मिरविणारा, लहान बाळांना बोर न्हाण घालून मजा आणणारा, आबालवृध्दांना पतंगबाजी करायला लावणारा हा सण देशात वेगवेगळ्या नावाने आणि वेगवेगळ्या पध्दतीने साजरा केला जातो.
बाय द वे, शरीरावर ठराविक ठिकाणी तीळ असला की सौंदर्यात भर पडते व कधी कधी जन्मखूण म्हणून
उपयोगी पडतो.
Comments
Post a Comment