सौभाग्यलेणे
“तुळशी विवाहाचा” समारंभ दरवर्षी दिवाळीनंतर असतो. त्यानंतर लग्न व मुंजीचे मुहूर्त चालू होतात. प्रत्येक घरात विवाह हा एक मोठा सोहळा असतो. खरेदी, दागिने, कपडे, मानपान, नटणे इत्यादीची धमाल असते. लग्न मुलाचे असो की मुलीचे लगीनघाई सारखीच असते. आई- वडील, मुले, नातेवाईक, मित्र मंडळी, शेजारी यांची नुसती धावपळ सुरू असते, लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंत.
लग्न समारंभात दागिन्यांमध्ये “मंगळसूत्र”
हा एक महत्वाचा दागिना असतो. बहुतांश मराठी लोकांमध्ये लग्नात मंगळसूत्र घालण्याची
पध्दत असते. खरंतर विवाह हा एक संस्कार आहे. विधीवत कन्यादान, सप्तपदी, लाजाहोम, आणि
मंगळसूत्र अशा विधींमध्ये हा सोहळा विभागलेला असतो. प्रत्येक विधीमागे शास्त्र असते
आणि ते भटजी करून घेतात. त्यात एक विशिष्ट अर्थ असतो. अशा या विधींमध्ये मंगळसूत्र
हे एक प्रमूख भुमिका बजावते. सौभाग्यलेणे ही एकमेकांना बांधून ठेवण्याची एक परंपरा
आहे. कायम सोबत रहाण्याची एकमेकांनी घेतलेली प्रतिज्ञा आहे. निसर्गचक्र सुरळीत चालू
रहाण्यासाठी पुर्वजांनी आखून दिलेली एक चौकट आहे. ज्यामूळे बेजबाबदारपणा आणि अवखळपणा
नष्ट होऊन प्रापंचिक जबाबदारी स्विकारल्याचे एक द्योतक आहे. असे पिढ्यांनपिढ्या चालत
येणारे काही रितीरिवाज सामाजिक संकेत पाळून “सुखी आयुष्य कसे जगावे” याचा स्तुत्य पाठ
आहे. सहसा लग्न झाल्यावर कुणी बिघडत नाही कारण तो किंवा ती नकळतच एकमेकांचा विचार करावयाला,
एकमेकांचा परीघ विस्तारायचा प्रयत्न करीत असतात. हळूहळू एकमेकांच्या सहायाने आयुष्यातील
एक एक टप्पा गाठून पुढील वाटचालीस सुरूवात होते. नैसर्गिक आकर्षण निर्माण झाल्यामूळे
प्रेम, वात्स्यल्य आणि अधिकार एकत्र येऊन नवीन पिढी जन्माला येण्याचा मार्ग सुकर होतो.
इथे एक साखळी पुर्ण होते व दुस-या साखळीला
सुरूवात होते. म्हणून मंगळसूत्र हे एक सौभाग्यलेणे न उरता मातृपद व पितृपदाकडे नेणारे
जबाबदारीचे पाऊल ठरते.
हा दागिना स्त्रियांनाच का? पुरुषांना
का नाही? असा प्रश्न विचारणारे पण लोक आहेत. त्यावर उत्तर एकच “सोने” जपले जाते कारण
ते मौल्यवान असते, “लोखंड” मात्र कुठेही असले तरी फरक पडत नाही. मंगळसूत्र घातल्यावर वाईट नजरेपासून बचाव होतो.
Comments
Post a Comment