लाभेविण प्रीती
“लाभेविण प्रीती” फक्त आई-वडील आपल्या मुलांवर करू शकतात. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता निर्वाज्य प्रेम करणे म्हणजे “लाभेविण प्रीती” होय. आपल्या आजुबाजूचे वातावरण, माणसे आणि परिस्थिती यातून माणूस घडत असतो. ज्या झाडांची आपण सावली घेतो. ती आपण लावलेली असतात का? किंबहूना झाड लावलेल्या माणसांना त्या झाडाची सावली कधीच मिळत नाही. ती दुस-या किंवा तिस-या पिढीला त्या झाडाची फळे किंवा सावली मिळते. माझ्या आजोबांनी झाड लावताना फळ कधी लागणार आणि आपण कधी खाणार याचा विचार केला असता तर मला आता त्या झाडाची फळे खायला मिळाली असती का? अशी अनेक उदाहरणे आपल्या आजुबाजूला मिळतील.
पुर्वीचे ऋषि-मुनी, संत यांनी जगाच्या कल्याणासाठी आणि “लाभेविण प्रीती” साठी जन्म घेतला होता. त्यांनी लिहिलेले अभंग, गाथा, वेद आजही आपल्यासाठी मार्गदर्शक ठरत आहेत. तसेच शास्त्रज्ञ ज्यांचे शोध लावण्याचे प्रयत्न वर्षानुवर्षे चालू असतात.
शोध पूर्ण झाल्यावर मानव जातीच्या कल्याणासाठी उपयोग होतो. कित्येक प्राचीन वास्तू, किल्ले, मंदिरे हे काही फायद्यासाठी किंवा प्रसिध्दीसाठी नसतात तर पुढच्या पिढीसाठी वारसा देण्यासाठी असतात. कित्येक वेळा डॉक्टर्स, वकील, शिक्षक विनामोबदला मार्गदर्शन करतात तर कधी आर्थिक मदत करतात ती केवळ “लाभेविण प्रीतीच” असते. अनेक समाजसुधारक, क्रांतीकारक ही “लाभेविण प्रीतीची” उदाहरणे आहेत. जवान किंवा शेतकरी हे सुद्धा लाभेविण प्रीतीच करत असतात.
अनेक प्रसंगात आपल्याला अनोळखी माणसांची मदत होते. नंतर तो मदत करून निघून जातो. साधे आभारसुद्धा मानता येत नाहीत. अशावेळी ही “लाभेविण प्रीती” म्हणावी लागेल. यामागे केवळ दुस-यांचे भले व्हावे अशी भावना असावी. निसर्ग तर कायमच लाभेविण प्रीती करून माणसा समोर स्वत:चा आदर्श ठेवत असतो. मग आपण जशी “लाभेविण प्रीती” अनुभवतो तशीच आपणही दुस-यांवर करावी ही अपेक्षा.
Comments
Post a Comment