व्रतवैकल्ये आणि आपण

 


            हिंदू धर्मामध्ये व्रतवैकल्यांना खूप महत्व आहे. आमच्या लहानपणी अनेकजण अनेक वर्षांपासून वेगवेगळी व्रतवैकल्ये करीत असत. त्यामुळे अपेक्षित काम होते किंवा होईल अशी त्यांची श्रद्धा असायची त्याना मानसिक आधार  मिळायचा आणि कधी कधी यशस्वीपण व्हायचे. मग व्रतवैकल्याचे आपापल्या परीने  उद्यापन आणि सांगता करीत असत.

            यामागे मन:शांती आणि मन:शक्ति वाढ़ण्यास मदत व्हायची. तसेच त्या संकटाची तीव्रता कमी होण्यास मदत व्हायची. कांहीं तरी त्याग केल्याशिवाय लाभ होणार नाही अशीही एक त्यामागे भावना होती. विशेषतः स्त्रिया व्रतवैकल्य जास्त करायच्या. अजूनही काहीजण व्रतवैकल्य करत असतात. हा ज्याचा त्याचा विश्वास आणि श्रध्देचा वैयक्तिक प्रश्न आहे. काही पुस्तके, मोठ्यांचे अनुकरण किंवा पारंपारिकता जपावी जेणेकरून मनाला  शांती दिलासा मिळेल असेही काहीजणांना वाटते.

           काहीजण समाजातील अपंग,  आदिवासी, व्याधीग्रस्त लोकांसाठी, शिक्षण, आरोग्य सेवा,  प्राणीमात्रांचे संगोपन, निसर्गसंवर्धन असे सेवेचे व्रत घेऊन एक व्रतस्थ जीवन जगतात.  आपणही आपापल्या परीने आधुनिक काळाची गरज ओळखून आपल्या आयुष्यात करण्यास काही गोष्टी अंगीकारु शकतो. हल्ली वेळ नाही, जुने रीतीरिवाज आवडत नाही किंवा पटत नाहीत. त्याला आधुनिक काळातील गरजेनुसार शास्त्रीय जोड दिली तरी आपणास एक मानसिक समाधान मिळावं अशी इच्छा असली म्हणजे झाली. जसे कि, रोज एक तास स्वतःस वेळ देणार, कुटूंबासाठी काढणार, वृद्धाश्रमात किंवा अनाथाश्रमात जाऊन आपला वेळ किंवा त्यांना उपयोगी काही खास गोष्टी आवर्जून द्याव्यात. अंध बांधवाना वाचून किंवा परीक्षेत लिहिण्यास मदत करणे, आपले ज्ञान मोफत देवून समाजसेवी उपक्रमात भाग घेणे अशा अनेक गोष्टी आहेत. ज्या आपण व्रत म्हणून करू शकतो. यामुळे आपले मन गुंतून ताण-तणाव कमी होऊ शकतो. याच्या परिणामी मानसिक समाधान मिळते आणि एखाद्याला योग्य वेळी मदत केल्याचे पुण्य पदरात पडते.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव