शाश्वत प्रगती
प्रगती म्हणजे सुखासिन आयुष्य असा बराच जणांचा गैरसमज असतो. आज 2 चाकी वाहन असेल तर उद्या 4 चाकी वाहन हवे. 1 बीएचके असला तर 2 बीएचके. अशा जीवनाकडून आपल्या अपेक्षा वाढवत ठेवायच्या. त्या पु-या झाल्या की, आणखी पुढे पुढे अमर्याद अपेक्षा वाढत जातात व त्यालाच प्रगती समजली जाते. ही खरंच गरज आहे का?. आवश्यकता आहे? कधी आणि कुठपर्यंत धावायचे हे आपण ठरविले पाहिजे.
भारत महासत्ता होणे म्हणजेच आर्थिक सुबत्ता येणे असे अपेक्षित धरतात. खरेच हा निर्देशांक आहे का? सर्वांगिण विकास अपेक्षित आहे का ?
सर्व साधने वापरून स्वयंपूर्ण बनणे म्हणजे विकास की प्रगती? मानवी जीवन नुसते भौतिक सुखाने समाधानी होते का? त्याला शांती व समाधान मिळते का? जे मिळाले ते टिकवायचे की फक्त मिळवतच राहायचे? आई म्हणायची “जे मिळाले त्यात आनंद माना” अधिकच्या मागे धावलो की मृगजळासारखे पुढे पुढे धावतो आणि एका टप्प्यावर माणूस दमतो. अरे! कशासाठी हा एवढा अट्टाहास केला? काही दिवसांनी असा प्रश्न त्याला स्वत:लाच पडतो.
पुर्वी मोठी माणसे म्हणावयाची की, “चादर बघून हातपाय पसरा” आताची पिढी म्हणते “चादरच मोठी घ्या म्हणजे हातपाय आतच रहातील” हा दृष्टीकोनाचा व विचारातील फरक
किंवा दोन पिढीतील अंतर असे म्हणता येईल. नदीचे पाणी बारमाही असते तर धबधबा फक्त पावसाळ्यात दिसतो. म्हणूनच आपल्याला शाश्वत प्रगती पाहिजे की क्षणभंगुर सुखलोलूपता हवी हे ज्यांनी त्यांनी स्वत:च ठरवावे. जी गोष्ट व्यक्तीची
तीच कुटूंबाची आणि पर्यायाने देशाची घडू शकते. त्यासाठी सगळ्यांचे एकत्रित व प्रामाणिक प्रयत्न आणि जिद्द हवी.
अनिश्चितता प्रत्येक पावलावर आहे. म्हणून आपण जगणे सोडून देत नाही.
शाश्वत मूल्यांवर आधारित (स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्याय) आधारित विकास झाला तर त्याचे फळही दिर्घकाळ टिकेल आणि शाश्वत मुल्यावर आधारित प्रगती होईल. चढता आलेख केव्हाही प्रगती दर्शविते पण ती क्षणिक ठरू नये. प्रगती वृध्दिंगत करण्यासाठी मनापासून सर्वांनी प्रयत्न करावेत. शाश्वत विकास हा दिर्घकालीन फायद्याचा ठरतो. तर भ्रामक प्रगती ही कधीकधी माणसासाठी मारक ठरू शकते.
Comments
Post a Comment