लॉकडाऊन आणि कौटूंबिक बदल
करोनाची लक्षणे आणि त्याचे गांभिर्य जाणवल्यावर आपल्याकडे लगेच सर्व काही अचानक
बंद करण्यात आले. कोणतीही
पुर्वकल्पना नसल्यामूळे काय आणि कसे करावे
याचे भान यायला लोकांना वेळ लागला. त्यातही दुरदर्शीपणाने सामान,
औषधे, इतर जीवनावश्यक वस्तूंचा साठा करुन ठेवलेल्या
लोकांना फारसा फरक पडला नाही. परंतु ज्यांच्याकडे काहीच नव्हते त्यांना खुप समस्यांचा सामना करावा लागला.
गृहिणींना सगळेजण घरात असल्यामूळे जास्त त्रास झाला. घरातून काम व कामातून घर अशी दुहेरी
भूमिकासुद्धा निभावयास लागली. अनेक प्रकारचे आकस्मिक त्रासही
उदभवले. घरातले वृध्द
आणि मूले यांना जास्त जपावे लागले. सगळी कामे वाटून दिली.
कामवाल्या मावश्या, स्वयंपाकीण बाई नसल्याने “आपला हात जगन्नाथ” चा साक्षात्कार झाला. मुले समजूतदारपणे घरात रमायला लागली. सगळेजण एकत्र रहाण्याचा
आनंद मिळाला. परंतू नंतर पुढे काय? हा प्रश्न
भेडसावला.
घरचे आर्थिक गणित बिघडलेले होते, त्यामुळे आता पुढे काय
करायचे? यातुन मार्ग कसा काढायचा याबद्दल विचार-विनीमय होऊ लागला. काही जणांनी घरगुती उद्योग सुरू करायचा
प्रयत्न केला. काही जण
मूळ गावी जाण्यास निघाले. परंतु वाहतुक व्यवस्था बंद असल्याने
त्यांचे खुप हाल झाले. शासन, सामाजिक संस्था, सामाजिक
माध्यमे यांनी या काळात मोलाची भुमिका बजावली. ज्या घरातून आवश्यक
सेवांतर्गत कामाला जात होते त्यांच्या घरातले इतर सदस्य “संसर्गाच्या
भितीने” कायम चिंतेत असायचे. डॉक्टर,
नर्स, स्वच्छता कर्मचारी, बॅक कर्मचारी, शासकीय कर्मचारी, दुध, पाणी, वीज पुरवठा करणारे,
वाहतूक सेवेतील कर्मचारी यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा पुरविल्या,
त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच. सोसायटीतून हळूहळू
एकत्रीतपणे भाजीपाला, किराणा सामान मागविल्यामूळे बाहेर जाणे
ब-याच प्रमाणात टाळता आले. एकमेकांना हवी
ती मदत करायला लोक तयार झाले. ब-याच ठिकाणी
माणूसकी, आपुलकी, कष्टाची जाणिव व सामाजिक
बांधिलकी दिसून आली.
वाईट एवढेच वाटते, ज्या घरात मृत्यू झाले त्यांना किती
त्रास झाला असेल? याची कल्पना देखील करू शकत नाही. खरंच एवढी मोठी किंमत देऊन आपण काय शिकलो? यातून धडा घेऊन आपण नेहमीसाठी सुधारलो
का? सुधारलो तरी असेच
वागणार का? स्वच्छता, सुरक्षिततेचे नियम
पाळणार का?
“तुमचे कुटूंब तुमचे जबाबदारी” या अंतर्गत आता आपण आपली काळजी घेतली पाहिजे. जबाबदारीने वागून दुस-यांनाही त्रास होऊ नये हीच अपेक्षा.
Comments
Post a Comment