सेवानिवृत्ती

               माझ्या एका स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या मैत्रिणीचा निरोप समारंभ होता.  थोडक्यात तिचे भाषण असे होते. “आज इतक्या जणांनी मी केलेल्या कामाचे कौतुक केले. या व्यवस्थेची छोटीशी भाग होऊ शकले.  प्रामाणिक काम केल्याचे समाधान व लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली या बद्दल मी स्वत:ला खुप भाग्यवान समजते. कामातून जरी स्वेच्छानिवृत्ती घेतली असली तरी पुढील आयुष्य भरभरुन जगण्याची ही एक संधी आहे असे मला वाटते”.

              सेवानिवृत्ती हा एक आयुष्यातील नवीन टप्पा. स्व: चा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होऊन त्या दिशेने आनंदाने मार्गक्रमण करणे हेच खरे सेवानिवृत्तीनंतरचे काम. एकदा का हा शोध लागला की, उर्वरित आयुष्य जगणे सुखाचे ठरते.  पुर्वी हा एक कंटाळवाणा टप्पा वाटायचा कारण पैसा आणि संसाराची जबाबदारी यात पुरूष एवढा मग्न असायचा की सेवानिवृत्ती कधी आली हे कळायचे नाही.  येणारा पैसा थांबल्यामूळे पुढे काय होणार आणि दुस-यांवर अवलंबून रहावे लागणार ही एक अपराधी भावना वाढत जायची. एकत्र कुटूंब आणि कौटूबिक जिव्हाळा असल्यामूळे सर्वजण एकमेकांना समजून घ्यायचे.

             आता तसे नाही. पुरेसा पैसा गाठीशी असतो. नियोजन व्यवस्थित केल्यामूळे भविष्याची चिंता थोडी फार कमी होऊ शकते. आता निवृत्त लोक जास्त क्रियाशील असतात. वेगवेगळे छंद, उपक्रम आणि आर्थिक गुंतवणूक आधीच चालू केलेली असते. विभक्त कुटूंब पध्दतीमूळे नौकरदार गृहिणी आणि मुलांच्या भविष्याची चिंता याचे व्यवस्थित नियोजन केलेले असते. स्वत:चा आत्मसन्मान, आरोग्य आणि अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी सक्षम झालेले असतात.

                स्त्रियांच्या बाबतीत सेवा निवृत्ती फक्त कार्यालयीन कामाबाबत होऊ शकते. इतर घरची कामे आणि मुलाबाळांची जबाबदारी कायमच असते. त्याच्यातून सुटका नसते. त्यातच आरोग्य विषयक तक्रारी उदभवतात आणि इतर काही मानसिक ताण उदभवतात त्यामुळे त्याबाबत कधी कधी संभ्रम निर्माण होऊ शकतो.  मुलींचे लग्न, बाळंतपण, नातवंडाची जबाबदारी याचे नव्याने नियोजन करावे लागते. आता स्त्रिया त्यातूनही काही प्रमाणात मार्ग काढत आहेत.

             प्रसंगी मुलांच्या मागे ढाल बनतात तर आता मी मुक्त झाले म्हणून मुलानाही आत्मनिर्भर बनण्यास प्रोत्साहित करतात. सामाजिक उपक्रम, शारिरिक स्वास्थ या बाबत जागरूक राहतात. सेवानिवृत्ती अटळ आहे पण मन स्विकारत नाही. अधिकार गाजविण्याची वृत्ती निवृत्तीनंतरही जर कायम ठेवली तर अनेक समस्या विनाकारण उदभवू शकतात.  “जिंदगी मिलेगी ना दुबारा” हे लक्षात घेऊन मनासारखे जगा आणि आनंदी रहा.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव