पत्रास कारण की

 दिनांक 9-10-2020 ला टपाल दिन असतो. त्यानिमित्त अनेक पत्रांच्या आठवणी मनात रेंगाळल्या. टपाल खात्याचे महत्व आपल्या आयुष्यात अनन्य साधारण आहे. संदेशवहन हे जरी मुख्य कार्य असले तरी त्या निमित्याने एक सामाजिक कर्तव्य, माहितीची, वस्तूंची देवाणघेवाण आणि ते ही एक नाममात्र शुल्क आकारून. खरंच लहानपणी आमची मजा कधी कधी पत्राची वाट पहाण्यात आणि पत्र उघडून वाचण्यात असे. 10-15 ओळी किंवा पोस्ट कार्डावर किमान 4 ओळी लिहण्यात किती आनंद मिळत मिळत असे ते आम्ही आणि आमच्या आधीच्या पिढीने अनुभवले आहे. ती मजा आत्ताच्या Email किंवा Messenger ला येत नाही.

          पत्रात लिहीलेल्या अक्षरावरून माणसाच्या व्यक्तिमत्वाची ओळख पटत असे. लग्नाच्या आधी व नंतरची असे दोन भाग केले तरी त्याचा मोठा संग्रह माझ्या घरी आहे. मी स्वत: अबोल असल्याने पत्रातून काही गोष्टी लिहिण्यात सोपे जातात. सविस्तर लिहीता येते तेवढे बोलता येत नाही. ब-याच वेळा पत्रांची अदलाबदल किंवा उशीरा येण्यामूळे कधी कधी विनाकारण गैरसमज तयार होत असत.  पत्रलेखनाची आवड मला लहानपणापासून होती. अजूनही काही महत्वाचे बोलायचे असल्यास जे फोन वर किंवा मोबाईलवर बोलता येत नाही ते मी पत्रातून कळविते.

          शेवटचे पत्र मला वाटते मी सन 2018 मध्ये लिहिले.  शेवटचे पत्र मला सन 2019 मध्ये आले असावे. माझ्या बालमैत्रिणीच्या पत्राचा एक ठेवा हा एक अखंड मैत्रीचा पुरावा आहे. तर क्वचित प्रसंगी येणा-या मावशी, भाऊ- बहिणी आणि मुली हा वारसा अजून जपत आहेत याचा पुरावा आहे. दोन्ही मुलीने पाठविलेले पहिले पत्र अगदी फ्रेम करून ठेवावे असे वाटते. (व्याकरणातील चुका सोडून) पण प्रतिसाद देणे हे महत्वाचे  तसेच वहिनीच्या आईचे पत्र हळूवार नात्याची गुंफण आणि मने कशी जोडू शकतात याचा पुरावा आहे. म्हणून कारण काहीही असो पत्र लिहून मोकळे व्हावे. पत्र लेखन हे ताण-तणाव दूर करण्याचे एक साधन होऊ शकते

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव