रातराणीची फुले फुलताना

                 रातराणी म्हणजे “सुंदर रात्रीला पडलेले एक सुगंधी व सुरेल स्वप्न”. रातराणीची फुले फुलताना कुणी बघितले आहे का? कसे बघणार? रात्रीची  ना!  सकाळी उठून बघितले तर छोटी लांब उलटी टांगलेली किंवा कोमेजलेली फुले आढळतील तुम्हाला. अगदी लांबूनही या फुलाचा वास उग्र आणि धुंद करणारा असतो. म्हणूनच कदाचित सापाचे वास्तव्य असते असे म्हणतात माझ्या कंपाऊंड मध्ये मागच्या बाजूला रातराणीचे झाड असून एकदाही कोणाला साप दिसला नाही. निसर्गाची पण कमाल आहे. पांढरी चादर ओढल्यासारखी दिसणारी फुले चक्क रात्री उमलतात जेव्हा सगळे जण झोपलेले असतात. अशा या रातराणीसारखी काही मने पण रात्री जागे होतात आणि अनेक विचारांनी फुलून जातात. त्या विचारांचा गुच्छ दुस-या कुणाला दिसत नाही किंवा स्वत: तो माणूस सकाळ पर्यंत विसरून जातो.

              काही निशाचर पक्षी असतात उदा. घुबड तशीच काही माणसेपण असतात ज्यांची प्रतिभा खुलण्यासाठी रात्रीची शांतता आवश्यक असते. त्यामुळे त्यांना चांगले चांगले सुचत असते. विशेषत: विद्यार्थी, रात्रपाळीतील आयटीचे कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी इत्यादीना रात्रीच काम जास्त असते कारण इतर सर्वजण झोपलेले असतात तेव्हा हे लोक जागे राहून देशाचे, मालमत्तेचे आणि एकूण मानवाचे हित राखत असतात. हेच काम कदाचित रातराणीसुद्धा करीत असावी कारण इतर फुलांचा हा बहराचा आणि फुलण्याचा काळ असतो तेव्हा त्यांना संरक्षण देण्यासाठी रात्रीचा पहारा करून सकाळी झोपी जात असावी.

               एकूण काय, निसर्गातला प्रत्येक घटक काहीना काही आपल्याला शिकवतच असतो. साधी छोटीशी मुंगी पासून महाकाय गेंड्यापर्यंत, बदकापासून ते गरूडापर्यंत, नाकतोड्यापासून हत्तीसारख्या अजस्त्र प्राण्यापर्यंत निसर्गचक्र चालू रहाण्यासाठी काहीना काही मदतच करीत असतो. मग आपण मागे का? सगळी फुले पहाटे फुलतात  ब्रम्हकमळ आणि रातराणी या दोघांना रात्री फुलण्याचे वरदान का दिले असावे हा एक संशोधनाचा विषय असू शकतो.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव