या चिमण्यांनो या
नुकताच जागतिक “चिमणी दिन” साजरा करण्यात आला. “चिऊ-काऊ” च्या गोष्टी शिवाय आपले किंवा कोणाचेही बालपण पूर्णच होऊ शकत नाही. निसर्गाची छोटीशी पक्षांची एक जात “चिमणी”. माणसाचे आयुष्य सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत व्यापून टाकते. सकाळी उठायच्या आधी त्यांची चिवचिव सूरू होते. आपण अजून अंथरूणात असतो, जणू चिमण्या आपल्याला उठवायला येतात. कोंबडा आरवला की पहाट झाली असे म्हणतात चिऊताईची चिवचिव ऐकल्याशिवाय सकाळ झाल्यासारखी वाटतच नाही. सुदैवाने माझ्या कंपाउंडमध्ये झाडे खूप असल्यामूळे पोपट, कावळे, चिमण्या, कोकीळा, कबूतर हे सतर असतात कधी कधी घारसुद्धा बघायला मिळते.
मुंबईत चिमण्यांची संख्या कमी झाली म्हणून ऐकले होते. आमच्याकडे दक्षिण मुंबईत अजूनतरी थोड्या चिमण्या दिसतात. हा नैसर्गिक ठेवा आपल्याला काय काय शिकवत असतो.!
छोटे छोटे दाणे टिपणे- आनंदाचे क्षण टिपणे. चिवचिव करीत रहाणे- गुणगुणत रहाणे. किवा स्वत:शी बोलत रहाणे (मनात किंवा इतरांशी). काड्या काड्या जमवून घरटे बांधणे. काटकसरीने राहून एखादे इप्सित साध्य करण्यासाठी मेहनत करणे. पिल्लांचे पालनपोषण करताना आई चिमणी दंग असते तेव्हा बाबा चिमणी बाहेर उभा राहून रक्षण करणे आणि दाणा-पाण्याची सोय करणे. कधी चुकून वादळवा-याने घरटे पडले, पिल्ले दगावली तरी पुन्हा दुस-या दिवशी निसर्गाची इच्छा प्रमाण मानून पुन्हा काडया जमविणे. पिल्लांना सक्षम करून त्रयस्थ भावनेने त्यांना आभाळात सोडून देऊन स्वतंत्र करणे. आता आपले काम झाले या आनंदाने जीवन व्यतित करणे अशा अनेक गोष्टी माणसांनी या पक्ष्यांकडून शिकून आचरणात आणल्या पाहिजे असे मला वाटते.
बाय द वे, फेसबुक सारख्या कंपनीने चिमणीची दखल घेऊन आपल्या एका उत्पादनाला चिवचिव (Twitter) करायला मुभा दिलेली आहे. माझ्या दोन चिमण्यापण दूरदेशी शिक्षण आणि नौकरीसाठी गेलेल्या आहेत. त्या जेव्हा परत येतील तेव्हा घर भरून जाईल आणि पुन्हा एकदा चिमणीचे आयुष्य आम्ही दोघे जगायला शिकू ही अपेक्षा. तुम्हीपण प्रयत्न करा आणि या छोट्या पक्षाच्या संवर्धनाची आपली जबाबदारीची जाणीव असू द्या. अशा या मानवरुपी चिमणीची आजच्या पर्यावरण दिनी प्रार्थना.
Comments
Post a Comment