हास्ययोग
“योगा दिवस” हा दरवर्षी दि. 21 जुन रोजी साजरा होतो. त्यानिमित्त सगळ्यांनी आपले हातपाय, शरीर आडवे-उभे करून बघितले. सगळे व्यवस्थित आहे म्हणजे रोज व्यायाम करायची गरज नाही असे समजून पुन्हा दैंनंदिन व्यवहार सुरू झाले. आता योगा म्हणजे कोणाला फॅशन वाटते. जेव्हा आजारी पडू तेव्हा बघू असे वाटते. तर काही जणांना योगा हा म्हातारपणी करायचा असतो असे वाटते. एकूण काय फार कमी लोकं योगाकडे गांभिर्याने बघतात. तरी हल्ली निरनिराळ्या व्यक्ती (श्री. श्री रविशंकर, बाबा रामदेव, ऋजुता दिवेकर आणि इतर अनेकजण ) योगाकडे लोकांना आकर्षित करत असतात.
योगाचे अनेक प्रकार आहेत. त्यातच एक “हास्ययोग” सर्व काही विसरून मनापासून हसणे हा सगळ्यात चांगला फलदायी योगाचा एक प्रकार आहे. ज्यामूळे शरीरातील सर्व स्नायु आकुंचन व प्रसरण पावतात. सकाळी उठून बागेत गेलात तर तुम्हाला अनेक प्रकारचे हास्य ऐकायला किंवा बघायला मिळेल. याला काहीजण “लाफ्टर क्लब” किंवा “हास्यक्लब” असे म्हणतात. वास्तविक हसणे जेवढे नैसर्गिक असते तेवढे शरीरात रक्ताभिसरण चांगले होण्यास मदत होते. म्हणून हसमूख व्यक्तिकडे बघितले तरी दुस-यांचे मन प्रसन्न होते. फार कमी जण असे निर्भेळ हसू बाळगतात. एकतर लहान मूले नाहीतर म्हातारी माणसे ज्यांचा व्यावहारिक जगाशी काहीही संबंध नसतो, अशा व्यक्ती हसमूख राहू शकतात असे मला वाटते.
साधे दुकानात वस्तू खरेदी करायला गेलो आणि दुकानदार जर दुर्मूखलेला चेहरा घेऊन वस्तू विकत असेल तर आपण जास्त वेळ त्या दुकानात थांबत नाही. याऊलट जर
दुकानदार हसमूख असेल तर दोन वस्तू जास्त विकत घेतल्या जातात. तेव्हा विक्रीसाठी किंवा
सार्वजनिक ठिकाणी हसून काम करून घेणे हे आवश्यक ठरते. न होणारी कामे जर हसत हसत
केली तर कामे कधी संपली ते कळतच नाही. श्री.पु.ल. देशपांडे, श्री.प्र. के. अत्रे,
व्यंग चित्रकार श्री. आर. के. लक्ष्मण यांचा हसविण्याचा दर्जा उच्च होता आणि त्याचा खोलवर परिणाम त्या काळातील समाजमनावर
होता.
Comments
Post a Comment