. ऋणानुबंध
ऋण म्हणजे खरं तर कर्ज. आपण नातेसंबधांविषयी असे का बोलतो? देणे आणि घेणे एवढ्या 2 प्रतिक्षिप्त क्रियेने हे संबंध जोडले जातात म्हणून कदाचित असे म्हणत असावेत. विचार, प्रेम, काळजी, सुसंवाद इत्यादी मुळे आपली नाती तयार होतात, रुजतात. कित्येकवेळा असे कोणतेही कारण नसतानासुद्धा काही नाती अचानक आयुष्यात येतात आणि खूप काही देवून जातात. संकटात असताना अचानक धावून येतात तेव्हा ते माहीतसुद्धा
नसतात किंवा
त्यांना आपण ओळखत नसतो. ते त्यांची भूमिका न सांगता बजावून जातात. यालाच जुने ऋणानुबंध म्हणत असावेत का? कधी कधी रक्ताची परकी होतात किंवा त्यांना धावून येणे शक्य होत नाहीत तेव्हा अशीच परकी नाती किंवा मानलेली नाती मदतीला धावतात.
असे ऋण फेडणे कधी शक्य होईल असे नसते. मग आपण हीच गोष्ट करायची. जशी आपल्याला मिळाली तशीच इतरांनाही आपण मदत करावी. ही साखळी तुटू नये, नाहीतर माणूसकीवर विश्वास राहणार नाही. परक्या ठिकाणी गेल्यावर आपण भांबावतो, घाबरतो पण अचानक आयुष्यात कोण तरी येते आणि आपली भीती, नवखेपणा एकदम निघून जातो. अचानक एखादे जीवघेणे संकट उदभवते, काय करावे सुचत नाही, तेवढ्यात कोणतरी काहीतरी सुचवते आणि आपली चिंता कमी होते,मार्ग सुचतो. त्या वेळेची, काळाचे ते ऋण आपण कायम आपल्या मनात राहते आणि आपण परमेश्वराचे आभार मानतो.
प्रत्येक जीव एकमेकांना
प्रयोजनाशिवाय भेटत नसतो. कधी काळाची गरज तर कधी हिशोब चुकता करण्यासाठी अशा
व्यक्ती आपल्याला भेटत असतात आणि खुप काही देऊन जातात. म्हणून आपणही संधी मिळाल्याबरोबर
अज्ञात ऋण फेडण्याच्या तयारीत असावेत.
योग्य वेळी योग्य माणूस पोहोचणे हेही जेवढे महत्वाचे तेवढेच आवश्यक ती मदत मिळणे हेही एक ऋणानुबंधाचेच प्रकार असतात. निसर्गाचा नियम आहे एका हाताने घ्या, दुस-या हाताने द्या. म्हणून तर दोन हात दिले असावेत. घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत. आपणही आपली बुध्दी, कला, ज्ञान, शास्त्र याचा उपयोग इतरत्र कसा होईल याचा विचार करून ऋण फेडण्यासाठी नेहमी तयार असावे हीच अपेक्षा !
Comments
Post a Comment