पाऊस मनातला

              पावसाळा आला की, नवीनच लगबग सुरू होते. लहान मुलांना त्यांची दप्तरे रेनकोट आणि पावसात भिजणे . ची धमाल असते. जास्त पाणी जमले की, शाळेला सुट्टी मिळते. मग भिजायला जायची तयारी. भिजून आजारी पडले की आरडाओरडा त्यामुळे या ऋतूमध्ये आजारपण जास्त असतात. तरीही शेतक-यांसाठी वरदान ठरणारा पाऊस अवेळी आला की  सगळ्यांचे नुकसान करतो.

              नेमेची येतो पावसाळाम्हटले तरी त्याचा लहरी स्वभाव दरवेळी काहीतरी नवीन शिकवत असतो. वेगवेगळ्या गावचा पाऊस अनुभवयाची मजा काही औरच असते. मला स्वत:ला पावसात भिजायला आवडत नाही  पाऊस बघायला खूप आवडतो. विशेषत: -याखो-यातील धबधबे, पावसाने भिजलेली झाडे-झुडपे लगेच टवटवीत हिरवेगार दिसायला लागतात. पानावर पडलेले पावसाचे थेंब  खूप छान दिसतात.

             अशा या  निसर्गाच्या देणगीचे वरदान आपल्याला खूप काही देऊन जाते. मनाला उल्हासित तर करतोच पण बाहेर पाऊस पडतोय आणि घरात गरमागरम भजी, भाजलेले कणीस, समोसे इत्यादी बरोबर चहा पिण्यातील मजा काही औरच असते. अनपेक्षित आलेल्या पावसात भिजायला काही जणांना खूप आवडते. जमलेल्या पाण्यात मुले होडी सोडताना पाहून आपण कधी आपल्या बालपणात जातो ते कळत नाही. मन आनंदी असेल तर हा पाऊस सुखाऊन जातो. दु:खी असेल तर मनाला शांत करतो. सृष्टीचे चक्र सुरळीत चालण्यासाठी पाऊस हा आवश्यक असतो. चार महिन्याच्या पावसाने वर्षभराचे धान्य पिकते, पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण होते. वातावरण जसे थंड होते तसे आपले मन शांत होते. मनातही ओलावा दाटून येतो. पावसाळी सहल, कविता, गाणी, प्रेमाचे भरते ओसंडून वहात असतात. पुर्वी चित्रपटात एकतरी पावसाचे गाणे असायचे, त्याच्याशिवाय चित्रपट पूर्ण व्हायचा नाही. असा हा आनंद देणारा पाऊस धरणीला सुजलाम सुफलाम करून पुन्हा नव्याने पुढच्या वर्षी येण्याचे आश्वासन देतो म्हणूनच आपण त्याची दरवर्षी आतुरतेने वाट बघतो.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव