श्वास

          “जगणे म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या या दोन श्वासातले अंतर! इति बहिणाबाई चौधरी. आई बाळाला स्वत:चा पहिला श्वास देते, असे शास्त्रीयदृष्ट्या सिध्द झालेले आहे.

         श्वास चित्रपट बघितला आणि जीवनातील एक कटू सत्य समोर आले. इतर अनेक गोष्टींपेक्षा श्वास महत्वाचा. अनेक रोगी जेव्हा कोमामध्ये असतात ते केवळ त्यांचा मंद श्वास चालू आहे म्हणूनच अन्यथा इतर कोणत्याही गोष्टींचे त्यांना भान किंवा जाणीव नसते.

          ब्रम्हविद्या किंवा इतर कोणत्याही योगा प्रकारात श्वासावर नियंत्रण दर्जा सुधारण्यावर भर दिला जातो. श्वास अत्यंत मुल्यवान आहे पण तो निसर्गात फुकट आहे. कसे असते ना, फुकट मिळतो म्हणून त्याची किंमत नसते. रोजचा श्वास घेण्याचा एक क्षण थांबून बघा मग त्याचे महत्व कळेल. असा श्वास घेणे नियमित चालू आहे तो पर्यंत सारे काही आलबेल असते. शरीरातील कोणतीही यंत्रणा बदलली की लगेच त्याचा परिणाम श्वासावर होतो. जोरात धावून, चालून किंवा पळून बघा. कोणतीही मारामारीची, भीतीची, धाडसाची दृश्ये बघताना आपली धडधड वाढते, श्वास फुलतो मग श्वास नियंत्रणात येण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. एखाद्याबद्दल भावना ( प्रेम, राग किंवा द्वेश) प्रकट करताना सुद्धा श्वासावर नियंत्रण रहात नाही.

            गिर्यारोहण करताना, सीमेवर जवानांना आणि खाण कामगारांना ऑक्सिजन सिलेंडर्स लागतात. नैसर्गिक श्वास कमी पडतो आणिबाणीच्या प्रसंगी जसे की हृदयविकार, दमा आणि आताचा करोना यासाठी कृत्रिम श्वास यंत्रणेची आवश्यकता भासते. निसर्ग झाडे, आणि पानाच्या रुपाने आपल्याला ऑक्सिजनसाठी मदत करीत असतो. शहरीकरणाच्या नादात आपण झाडे तोडली, खाडी बुजवली, औद्योगिकरणामूळे प्रदुषणाची पातळी वाढून निसर्गाचा हास झाला. परिणामी नवीन संकटे उदभवली जसे की, सुनामी, अतिवृष्टी, भूकंप, जागतिक तापमानवाढीमूळे होणारे दुष्पपरिणामांना आपण सामोरे जात आहोत. करोनासारखे जागतिक संकट उदभवलेले आहेच, आणखी किती आणि काय काय समस्या उदभवणार आहेत ते माहित नाही.

            दुरदर्शनवर एक जाहिरात बघितली होती, ज्यामध्ये बाप-लेक मोटारगाडीत बसलेले असतात. सिग्नलमूळे गाडी थांबलेली असतानासुध्दा वडिलांनी गाडीचे इंजिन बंद केलेले नसते. मुलाला वडील विचारतात मोठा झाल्यावर तु कोण होणार? मुलगा सांगतो मी सायकल दुरुस्तीचे दुकान काढणार. आश्चर्यचकीत झालेले वडील कारण विचारतात तर मुलगा सांगतो की तुम्ही आताच एवढे पेट्रोल, डिझेल वाया घालवले तर आमच्यासाठी काय इंधन शिल्लक रहाणार? त्यावेळी सायकलला पर्याय रहाणार नाही मग माझे दुकान चांगले चालेल. ही जाहिरात बघून तरी लोकांनी उर्जा बचत करावी असे वाटते.

           कधीकधी असे वाटते, कदाचित पुढची पिढी गावाकडे वळायला लागेल. त्यांचा ओढा नैसर्गिक गोष्टींकडे जास्त असेल. वेळीच सावध होऊन झाडे लावावीत, शक्य असेल तेथे पायी चालत जावे, निसर्गाच्या सानिध्यात थोडे दिवस रहावे, फ्रिज, वातानुकूलित यंत्र, कुलर यांचा वापर शक्यतो कमी करावा. त्याच बरोबर श्वास केवळ हृदयात असतो असे नव्हे तर मैत्री, नात्यात हसत खेळत जगणे हा सुध्दा श्वास कमविण्याचा प्रकार आहे. त्राणविरहित आयुष्य स्वत: आणि इतरांनी जगावे असे वाटत असेल तर निसर्गापोटी कृतज्ञता बाळगा.

 

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव