श्यामची आई ते श्यामची मम्मी पर्यंतचा प्रवास
60 वर्षापुर्वीचा “श्यामची आई” हा चित्रपट तुफान गाजला होता. मुलांना शाळेतून मुद्दाम दाखवयाला न्यायचे. शाळेच्या ग्रंथालयात किंवा ज्यांच्या घरी लहान मूले आहेत त्यांच्या घरी “श्यामची आई” हे पुस्तक हमखास असायचे. एक भावनाशील, सुशील, सात्विक आणि प्रसंगी कठोर अशी सर्वगुणसंपन्न आईची प्रतिमा, जीचे नाव यशोदा सदाशिव साने ही प्रत्यक्षात साने गुरूजींची आई होती. यावर आधारित श्री. प्रल्हाद केशव अत्रे यांनी साकारलेली व अजरामर झालेली अशी “श्यामची आई” ही सुंदर कलाकृती होय. आई आणि मुलांच्या संबंधावर असलेला हा एक आदर्श वस्तुपाठ असे म्हणावे लागेल. बहुतेक आया त्याकाळातील कमी अधिक प्रमाणात तशाच असायच्या. शेवटी “आई सर्वत्र पुज्यते”, आजही तेवढेच आईचे स्थान महत्वाचे आहे.
आताची “श्यामची मम्मी” फार काही वेगळी नाही. स्वरुप बदलले तरी गाभा तोच आहे. आजची आई पण श्यामच्या आई सारखीच एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढत असते. त्यात तिला स्वत्व राखायचे असते. नौकरी किंवा व्यवसाय करते म्हणून आईच्या कर्तव्यात कसूर करू शकत नाही. श्यामचे बाबा आणि आजी-आजोबा असतील असे नाही. पण तरीही तिला श्यामला मोठे करावयाचे असते. नवीन नवीन आव्हांनाना सामोरे जायचे असते. पैसे पण कमावयाचे आणि घर पण सांभाळावयाचे असते. कोणतीही उणीव संसारात भासू द्यायची नसते.
बरे श्याम आज्ञाधारक असेलच असे नाही. आणखी एक जबाबदारी. त्याचे बालपण, तारूण्य, नौकरी लागून स्वताच्या पायावर उभे राहीपर्यंत कोणतीही आई स्वस्थ बसू शकत नाही. एवढे सर्व केल्यावर मूले एकत्र राहतील याची शाश्वती नाही. एकूण काय श्यामची आई ते श्यामची मम्मी पर्यंतचा प्रवास चालूच रहाणार आहे आणि तसा तो चालूच रहावा ही अपेक्षा.
जसा श्याम घडला तसा श्याम आता दुर्मिळ होत आहे याची एक खंत आहे. श्यामच्या आई प्रमाणे श्याम ही तसाच प्रेमळ, भावनाशील आणि सुधारिक मताचा बनला तर नक्कीच समाजाची उन्नती होईल यात शंका नाही.
Comments
Post a Comment