संविधानाचे महत्व

            नुकताच दि. 26-11-2020 ला 72वा संविधान दिवस साजरा करण्यात आला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर दि, 26-11-1949 रोजी संविधान लागू करण्यात आले. संविधानाची संहिता अत्यंत उज्वल, सामाजिक, न्यायपुर्ण आणि निती नियमास अनुसरून आखण्यात आलेली एक चौकट आहे. या चौकटीत राहून सामाजिक विकास होणे शक्य होणार आहे.

           मी, एक सरकारी अधिकारी आणि कायदेविषयक विभागात काम करत असल्याने दरवर्षी आमच्यासाठी हा दिवस महत्वाचा असतो. संविधानाची व्याप्ती एकूण 22 भागामध्ये विभागलेली असून त्यात 2 परिशष्टांचा समावेश आहे. कायद्याचा अभ्यास सर्वसाधारणपणे किचकट असतो असा गैरसमज आहे. पण व्यवस्थित, सखोल निरीक्षण आणि आकलनक्षमता असल्यास काही कठीण नाही. मोठ-मोठे वकील CA, लेखापरिक्षक या साठी नेमलेले असतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही अटी शर्ती असतात. अनिर्बंध स्वातंत्र्य घटनेत अपेक्षित नाही.

            कायदा आणि नियम याचे मुलभूत ज्ञान तरी प्रत्येकाला लहानपणापासून असावे असे अपेक्षित आहे. निदान 10वी नंतर तरी संविधानाचे सर्वसाधारण ज्ञान सक्तीचे करावे असे वाटते. समाजात घडणारे गुन्हे हे अज्ञान आणि शिक्षेबाबतची पुर्व कल्पना नसल्यामूळे घडतात. तसेच कायदा सर्वांसाठी समान असतो. आपल्यावर अन्याय झाला असे वाटत असल्यास कुणीही त्याविरूध्द वरिष्ठाकडे दाद मागू शकतो. आपल्या अनेक चुकीच्या रुढी, परंपरा सुध्दा कायद्यानेच बंद करण्यात आलेल्या आहेत. वचक आणि दंड असला तरच माणूस जबाबदारीने वागतो हे सर्वसाधारण निरीक्षण आहे.

           70 वर्षापुर्वीचा भारत आणि आत्ताचा भारत यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्यामागे महत्वाचे कारण आपण स्विकारलेली संविधानाची कायदेशीर चौकट. सर्वसमावेशक, भेदाभेद टाळून, सार्वभौमत्व टिकवणारी आणि लोकशाहीला पुरक अशी चौकट आखलेली पाहून आपण नतमस्तक होतो. धन्य ते बाबासाहेब आंबडेकर आणि त्यांचे सहकारी ज्यांनी एवढा सखोल दुरदर्शी विचार करून ही चौकट आखली.

            साधे साधे कायदे नियम आपण रोज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत नकळतच पाळत असतो. कसे ते पहा. सकाळी तयार होऊन बाहेर पडताना प्रवासाचा नियम लागू होतो. कार्यालयातील नियुक्ती नियमानुसार केली जाते. देण्यात आलेला पगार नियमानुसार होतो. खरेदीच्या वेळी ग्राहक कायदा लागू होतो. अपघात झाल्यास विम्याचा फायदा नुकसान भरपाईचा कायदा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण सरकारी कर्मचा-यांसाठीसुध्दा वर्तणूक नियम आहे. या सर्वांचे पालन तर आपण करतोच पण नाही केल्यास शिक्षा देखील मिळते.

           तुम्हीच ठरवा कायदा पाळणे योग्य की अयोग्य. बराच मोठा विषय आहे. मी आज फक्त त्याचे प्रास्तविक केले आहे. सगळ्यांना संविधानाचा मूळ अर्थ समजणे आवश्यक आहे एवढे नक्की.

 

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव