अशी ही आणीबाणी

         सन 1975 च्या दरम्यान आणीबाणी हा शब्द ऐकीवात आला होता. आर्थिक क्षेत्रात आपल्याकडे कायम आणीबाणी असते. आणीबाणीसदृष्य परिस्थितीत काही हक्कांवर गदा येते आणि उपाययोजनांची कठोरपणे अमंलबजावणी करावी लागते.

        सध्याची कोविड-19 ची परिस्थिती ही वैद्यकीय आणीबाणी म्हणावी लागेल. जी आपल्याला मागच्या वर्षापासून वाट्याला आणली गेली किंवा आणवली गेली हा वादाचा मुद्दा ठरू शकतो. त्यासाठी आपत्कालीन योजना कठोरपणे राबवयाला हवी होती. अफाट लोकसंख्या, आरोग्यसेवा, अज्ञान आणि गरीबींचे भान राखून सगळ्या योजना आखल्या जातात. संधीचा गैरफायदा घेणारे, साठा करणारे, असमान वागणूक देणारे यांचे फावते. एकीकडे या सर्वांवर नियंत्रण राखणे तर दुसरीकडे लोकांच्या मनातील भिती घालवून त्यांना वैद्यकीय उपचार आणि दैनंदिन सेवा उपलब्ध करुन देणे अशी दुहेरी कसरत शासनकर्त्याला करावी लागते. लोकांनीसुद्धा परिस्थितीचे गांभिर्य ओळखून तशी साथ देणे अपेक्षित असते. पण घडते उलटेच. जाणारे जातात (कधी ऑक्सिजन कमी, कधी व्हेंटीलेटर नाही, कधी अपुरे डॉक्टर, नर्सेस, कधी औषधांचा तुटवडा अशी अनेक कारणे) उरणारे नुसता आरडाओरड करून मूळ समस्येला बगल देऊन इतरत्र भरकटतात.

          अशा परिस्थितीत संयम बाळगणे कठीण जाते म्हणून मग एकमेकांवर दोषारोप करणे ( राजकीय मंडळी आपआपसात, वर्तमानपत्र अशाही परिस्थितीत दर्शक संख्या (TRP) वाढविण्यासाठी भडक बातम्या देणे, वैद्यकिय सेवेवरील अतिरिक्त ताणाची कारणमीमांसा करता केवळ शासनाला दोष देणे). अशा परिस्थितीत सर्व सामान्य जनता भरडली जाऊन त्याचे विपरित परिणाम बघायला मिळतात. ज्या व्हॅक्सिन, विशिष्ट औषधे आणि ऑक्सिजनसाठी जी धडपड चालली आहे त्याची पुर्वकल्पना किंवा अंदाज घेण्यास आपण कमी पडलो ही वस्तुस्थिती आहे. त्या त्या क्षेत्रातील तज्ञांनी हा अंदाज वर्तवून वैद्यकिय क्षेत्राला आणि औद्योगिक क्षेत्राला सतर्क करावयास हवे होते. केवळ वैद्यकिय कर्मचारी आणि डॉक्टर्स व्यतिरीक्त इतर बायोमेडीकल इंजिनियर्स, पॅरामेडीकल आणि स्वेच्छेने मदत करू इच्छिणारे स्वयंसेवक, संबधित तंत्रज्ञ यांनीसुद्धा परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन तात्काळ सेवा देण्याची तयारी दर्शवावयास हवी होती. मागील वर्षाची आणीबाणीची चुणूक बघून सुद्धा आपण अद्याप सशक्त आणि सावध झालो नाही तर आपल्यासारखे दुर्देवी आपणच.

यासाठी 1) आपत्कालीन उपाययोजना आणि 2) दिर्घकालीन उपाययोजना आखण्यात आल्या पाहिजेत. 1) आपत्कालीन उपाययोजनेत सर्व शक्य असलेल्या उपायांचा अवलंब करणे जसे की औषधे आयात करणे, तुलनेत अन्य बाबींवरील खर्च कमी करून जीवनावश्यक आरोग्यविषयक बाबींकडे वळविणे, औषधासाठी विपुल प्रमाणात कच्चा माल उपलब्ध करून देणे. आरोग्य सेवेशी संलग्न असलेल्या असलेला अधिकारीकर्मचारी जसे की, तंत्रज्ञ, वीजकंपनी, व्यवस्थापक आणि योग्य व्यवस्थापन याची आवश्यकता आहे. जसे की, पुर्वी युध्दकाळात रेडक्रॉस सोसायटी, गृह संरक्षक दल (Home Guards) यांची सेवा तसेच काही प्रमाणात सैन्याची सुद्धा मदत घेण्यात आली पाहिजे. आपत्कालीन व्यवस्थेस मदत करण्यासाठी सामाजिक संस्थेची, स्वयंसेवकांची मदत घेऊन परिस्थितीवर काही प्रमाणात नियंत्रण आणणे शक्य होईल.

2) दिर्घकालीन उपाययोजनेत निसर्गाचे संवर्धन, नैसर्गिक संपत्तीचा हास रोखणे यासाठीची उपाययोजनेचा आराखडा तयार करून त्याची कठोरपणे अमंलबजावणी करणे. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे, स्वच्छता ठेवणे, आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करणे याबाबींचा समावेश करणे आवश्यक असेल.

थोडक्यात, लोकांनी कोविड-19 ही एक निसर्गाची एक चपराक आहे असे समजले पाहिजे.पिक्चर अभी बाकी है! या धर्तीवर आरोग्याच्या आणीबाणीसदृष्य परिस्थितीतून आपण धडा घेऊन जागरूक राहून निसर्गाचे संवर्धन, स्वच्छता, यासाठी जागरूक राहिलो नाही तर भविष्यात मनुष्यजातीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव