क्षणभर विश्रांती
“क्षणभर विश्रांती” या नावाचे गोवा-मुंबई हायवेवर एक हॉटेल आहे. मला नांव ठेवणा-याचे खूप कौतुक वाटले. खरंच, क्षणभर थांबणे हे कोणत्याही लांबचा प्रवास करण्यामध्ये आवश्यक असते. प्रत्येक सजीव, निर्जिव वस्तूची, शरिराची, मनाची स्वाभाविक गरज असते. थोडे थांबून पुन्हा नव्या दमाने काम करायला ऊर्जा मिळते. कार्यालयात, मजुरांना मधली सुट्टी देण्याचा हेतूही हाच असतो.
मध्यंतरी एका गाण्याच्या मैफिलीला गेले
होते. कलाकाराने सुरुवातीलाच हात जोडून विनंती केली, कृपया आपलया भ्रमणध्वनीला “ क्षणभर
विश्रांती” द्या. किती योग्य होते त्यांचे म्हणणे. आपण एवढे मग्न असतो, समोरच्याचा
रसभंग होईल हेही आपल्या लक्षात येत नाही.
अध्यात्म्यातसुद्धा विश्रांतीला अत्यंत
महत्व आहे. पुर्वीचे गुरुजन तर मौन पाळणे, शांत बसणे या गोष्टीवर जास्त भर
द्यायचे. वैद्यकीयदृष्ट्या ठरावीक तास काम केले पाहिजे अन्यथा कार्यक्षमता कमी होत
जाते असे म्हटले आहे. कामाच्या तासावर बंधन घालण्याचा हेतू हाच आहे.
निसर्गातसुद्धा हा नियम पाळला जातो. पुण्याच्या
लोकांची खिल्ली उडवली जाते की 2 ते 4 या वेळेत सगळे व्यवहार बंद असतात म्हणुन. निरीक्षणांती असे आढळून येईल की त्यांची कार्यक्षमता जास्त असेल. काही लोकांचा
आवडता संवाद असतो, ”मरायला सुद्धा फुरसत नाही म्हणून”. तेवढा वेळ खरं तर कोणाकडेच नसतो.
आपल्याला मिळालेल्या आयुष्याचा संपूर्ण विचार करुन उपभोग, कर्तव्य, समाधान, पैसा,
स्वातंत्र्य अशा अनेक गोष्टी करायच्या असतात. हे सगळे करताना विश्रांती किंवा कुठे
थांबावे हयाचे भानदेखील असणे महत्वाचे असते. होते मात्र उलटेच. स्वत:ला आपण एवढे बांधुन
ठेवतो की कधीतरी देवालाच / परिस्थितीला दया येऊन आपली सूटका होते. तेव्हा वेळीच
सावध होऊन मध्ये मध्ये काही वेळ विश्रांती
घेणे सक्तीने करण्यापेक्षा स्वेच्छेने घेणे कधीही योग्यच ठरते.
महीलांसाठी तर ही विश्रांती अत्यंत आवश्यक
असते. दोन्ही आघाडी सांभाळल्यामूळे आधीच त्या हैराण झालेल्या असतात त्यात स्वत:कडे
दुर्लक्ष. यामुळे लवकर मन, शरीर थकत असते.
तेव्हा या क्षणभर सक्तीच्या विश्रांतीसाठी मुद्दाम काही योजना आखाव्यात जेणेकरुन
संपूर्ण कूटूंबाला यशस्वीरीत्या सांभाळू शकतील. मग काय घेणार ना क्षणभर विश्रांती!
Dhanyawad👍
ReplyDelete