प्रसाद

                  देऊळ, पुजा आणि प्रसाद यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. लहानपणी बहुदा मी  प्रसादाच्या ओढीने देवळात जात असे.  प्रत्येक देवळाचे वैशिष्ठ किंवा वेगळेपण ते देत असलेल्या प्रसादातून जाणवायचे. आलटून पालटून बालाजी, मारूती, गणपती आणि देवी यांच्या देवळात जाणे व्हायचे. देव, पुजारी आणि भक्त यांचा त्रिवेणी संगम होऊन जे आपल्याला मिळते त्याला प्रसाद म्हणावयास हरकत नाही. देवाला अर्पण करायचा म्हणून पुजारी प्रसाद मनापासून बनवितो आणि भक्तीभावपुर्वक अर्पण करतो. देवाने खाल्ला म्हणजे तो चांगला असेल आणि देवाच्या कृपाप्रसादाने आपले चांगले होईल या भावनेने भक्त प्रसाद ग्रहण करतात त्यामूळे प्रसाद गोड लागतो. साधी सत्यनारायणाच्या पुजेच्या प्रसादाची शि-याची गोष्ट बघा. घरात आपण बनवतो त्या शि-याला ती विशिष्ट चव नसते. अगदी तस्साच बनविण्याचा प्रयत्न केला तरी ती चव येत नाही.

               तिरूपतीचा लाडू विशिष्ट चवीसाठी प्रसिध्द आहे. पुर्वी हा लाडू मोठा आणि शुध्द तुपाचा बनविलेला असल्यामूळे त्याची चव अजुनही माझ्या जिभेवर आहे. जी गोष्ट प्रसाद खाण्याची तीच वाटण्याची. मला स्वत:ला प्रसाद वाटायला खूप आवडते. प्रसाद घेणा-याचे हात अगदी अधिरतेने पुढे येतात आणि मिळाल्यावर ज्या समाधानाने त्यांचा चेहरा फुलतो ते दृष्य बघण्यासारखे असते. मला हा भाव बघायला खूप आवडतो, जसे की, देवच प्रसन्न होऊन प्रसादरूपी आर्शिवाद मिळाला अशी त्यांची भावना असते आणि तीच खरी त्यांना आयुष्यात पुढे जीवन सुखकारक होण्यास मदत करते.

             मी काही वर्षापूर्वी कॅसिओ शिकायला जात असे तेव्हा सरांचा मुलगा साधारण 15-16 वर्षाचा असेल. एकदा क्लास संपल्यावर पटकन म्हणाला “प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये” मला एक सेकंद कळलेच नाही. तेव्हा अशी पध्दत होती, आठवड्यात दोन वेळा क्लास असे आणि जाताना शेवटी सर पुढच्या क्लाससाठी नोटेशन देत असत, ते पाठ करुन वाजविण्याचा आम्ही प्रयत्न करत असू. त्यादिवशी सर नव्हते म्हणून मला वाटले की नोटेशन मिळणार नाही.  सरांच्या मुलाने नोटेशनचे वर्णन प्रसादरुपी केलेले बघून त्यांच्या मुलाचे खुप कौतूक वाटले.  मनातल्या मनात म्हटले “जिते रहो बेटा.” याच भावनेने तो नंतर एक प्रसिध्द गायक, संगीतकार आणि वादक सुध्दा झाला. “संगीत हा सुध्दा एक प्रसाद समजायचा” ही शिकवण एका छोट्या मुलाने मला दिली.

                नवस करताना बरेच जण काही मागणी करतात व ती पुरी झाली की प्रसाद मिळाला समजून त्याचा श्रध्देने स्विकार करतात. काही जण आपल्या वाट्याला आलेले जीवन देवाचा प्रसाद समजून आदराने जीवन व्यतीत करतात आणि दुस-यांपुढे एक आदर्श निर्माण करतात. प्रसाद पोटभर नसतो पण तो सर्वांना वाटून खाण्यात जी मजा असते ती एकट्याने खाण्यात नसते. कार्यालयातसुध्दा कोणी शिर्डीला, वैष्णव देवीला, पंढरपूरला जाऊन आले की प्रसाद वाटतात. त्यामागेही हाच हेतू असावा.

            प्रसादाचा दुसरा अर्थ  “मार” किंवा “शिक्षा” असाही आहे. आपण चुकीचे वागलो तर असाही प्रसाद मिळतो, तो सुध्दा गोड मानून पुढे सुधारणा करावी लागते. आपल्याला मिळालेली बुध्दी, क्षमता, ज्ञान आणि कौशल्य हे पण आपल्याला मिळालेला देवाचा प्रसाद समजून इतरांना वाटला तर!

Comments

  1. खूप छान विषय निवडला आहे.
    सत्यनारायणाला शिर्‍याचा प्रसाद बनतो तसा प्रासादिक प्रसाद कधीच बनत नाही.
    'चमचाभर प्रसाद' व 'बशी भरून शिरा' हा फरक बहुधा असावा.
    तसेच श्रीगजानन महाराज प्रकट दिनी जो 'झुणका भाकरीचा' प्रसाद मिळतो त्याची चव काही अप्रतिमच, अवर्णनीयच!
    आम्ही म्हणजे पपा, आक्का, आत्या, लिना, पिंकू, छोटू व मी 1981 मध्ये गावाहून
    (कारवार) south च्या tripला गेलो होतो (छोटी व अण्णाच्या लग्नात आठवडा भराची gap होती). तेव्हा तिरुपतीला तू वर लिहीलैल्या प्रसादाच्पा लाडूची व दहिबुट्टीची चव अजूनही जीभेवर रेंगाळते आहे.
    गणेश चतुर्थीला विसर्जनाला गुळखोबरेतीळतूपकाजू ह्यांचा जो प्रसाद बनतो (पंचखाद्य वा पंचकात) त्याची चव काय सांगावी.
    असो, मारुतीची शेपटी वाढता वाढता वाढतच गेली.

    ReplyDelete
  2. Khoop chan lihita bhavojee tumhi!
    Rumhioan lihayla suruvat kara.
    Dhanyawad!
    Comment vachun lihilyache sarthak zalyasarkhe vatate!🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव