बोनस
बोनस म्हणजे 13 वे वेतन ( बक्षीस म्हणून दिलेला जादा वेतन), नफ्यातील हिस्सा किंवा सानुग्रह अनुदान अशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. दिवाळीच्या आधी मुख्यत: उत्पादन क्षेत्रात, काही शासकीय निमशासकीय कार्यालयात, रेल्वे बोर्ड, केद्रशासनाचे ठरविक दर्जाचे कर्मचारी यांना जाहीर केला जातो. 25-30 वर्षापुर्वी सामान्य माणसाला याचे खुप आकर्षण असायचे. मला पण नवीन नौकरीला लागले तेव्हा बोनस मिळत होता. नंतर काही कारणामूळे बंद झाला.
हा बोनस म्हणजे कर्मचा-याला एक प्रकारचे शाबासकी, प्रोत्साहन असायचे. त्या आकर्षणाने का होईना कर्मचारी मनापासून काम करेल आणि कंपनी प्रती आपुलकी राहील. जेणेकरून दोघांचाही दिर्घकालीन फायदा व्हावा. असा बोनस कधी आर्थिक स्वरुपात कधी गिप्ट व्हॉवचर ( खरेदी कुपन ) किंवा समभाग स्वरुपात मिळायचा. त्यामूळे दिवाळीत अनेक वस्तूंची खरेदी व्हायची आणि घरात आनंदी आनंद असायचा. आता ती मजा राहिली नाही. नाहीतरी हल्ली पैसा जास्त आणि आनंद कमी हेच समीकरण असते. आपण मात्र दुस-या अर्थाने बोनस मिळाल्याचा आनंद मानू शकतो. कसे ते पहा.
मोठ्या अपघातानंतर जीव वाचणे, दिर्घ आजारातून पूर्ण बरे होणे, मोठे नुकसान टळणे, मुले स्वयंपूर्ण बनून आप आपल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणे. आयुष्यात अनेक अडचणींना तोंड देऊन आता सुखाने उर्वरित आयुष्य घालविणे. सर्व सामान्य आयुष्य जगून झाल्यावर उरलेले आयुष्य समाजाची किंवा गरजूंना मदत करणे. यशस्वीरित्या नौकरीतून सेवानिवृत्त झाल्यावर कोणतेही पाश मागे न ठेवता निसर्गाच्या सानिध्यात शांतपणे जीवन व्यतित करणे. मूले-नातवंडे, यांच्या समवेत यांच्या बरोबर लहानपण पुन्हा जगणे. जे काही मिळाले त्यात समाधान मानणे. आवडीच्या क्षेत्रात रस दाखविणे. उरलेले छंद-आवड जोपासणे. आजुबाजूच माणसे, नाती आणि परिसर जपण्याचा प्रयत्न करणे. पर्यटन व निसर्ग संवर्धन करणे. आवडीचे साहित्य, वाचन, लेखन यांचा आस्वाद घेणे. आवश्यक तेथे जेष्ठतेचा फायदा करून देणे. अनुभव व क्षमता याचा योग्य वापर करणे. अशा अनेक प्रकारे बोनसरुपी मिळालेले जीवन व्यतीत करणे.
मिळालेले आयुष्य हे बोनस समजून त्याचा यथाशक्ती उपभोग घ्यावा, हीच येणा-या नविन वर्षानिमित्त (पाडवा) निमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा !
Comments
Post a Comment