ओम धन्वतराय नम:!

             नुकताच जागतिक “डॉक्टर दिन” होऊन गेला. त्यानिमीत्त वेगवेगळे संदेश,घटना,कथा आणि संदेश समाजमाध्यमातून वाचायला मिळाले. सहसा डॉक्टरांबद्दल चांगले लिहीले जात नाही म्हणून हा लेखन प्रपंच.

            लहानपणांपासून माझा डॉक्टरकाकांशी जवळून संबध आल्यामूळे त्यांचे रुग्णांसमवेतचे वागणे, बोलणे, औषध तयार करणे,तपासणे इत्यादी मी कुतूहलाने बघत असे. केवळ नाडी परिक्षा आणि डोळे तपासून औषध कसे काय देऊ शकतात याचे मला प्रचंड आश्चर्य वाटायचे.  सगळी औषधे, गोळ्या कसे लक्षात ठेवत असतील? आता तर वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या स्पर्धक बाजारात असतात मग हे त्याच्यातून कसे निवड करत असतील? त्यांची कायम शिस्त, लगबग, स्वच्छता आणि रुग्णांचा जीव वाचविण्याची धडपड आपल्याला नतमस्तक व्हायला लावते. डॉक्टरी शिकून तयार झाल्यावर त्यांना एक प्रतिज्ञा घ्यावी लागते. त्यात सगळे नियम, परिस्थिती,वागणूक आणि समाजकार्य यांचा समावेश करण्यात आलेला आहे. नुसती प्रतिज्ञा वाचली तरी मन भरून येते.

            आमच्या घरात सध्या डॉक्टरची तिसरी पिढी तयार झालेली आहे, अशी उदाहरणे कमीच असतील. आई-वडीलांची धावपळ, कार्यतत्परता, ताणतणाव बघून एखादा मुलगा किंवा मुलगी हा व्यवसाय किंवा संधी नाकारू शकतो. पिढीतल्या प्रत्येकाला डॉक्टर व्हावेसे वाटते म्हणजे हे संस्कार किती खोलवर रुजू शकतात याचे हे एक उदाहरण म्हणावे लागेल.  डॉक्टर घरातला असल्यामूळे आम्ही सगळेजण पहिला सल्ला त्यांचा घेतो आणि तेही तत्परेतेने सगळ्यांच्या मदतीला धाऊन जातात. आम्हा सर्व कुटूंबीयांना त्यांचा खुप आधार वाटतो आणि अभिमान वाटावा असेच ते वागतात. त्यांचे दैनंदिन आयुष्य एवढे व्यस्त असून सुध्दा इतर गोष्टींसाठी ते कसे काय वेळ काढू शकतात याचे मला कायम कुतूहलमिश्रीत आश्चर्य वाटते. बरं त्यांना (काकांना आणि भावाला मिळालेल्या) जीवनसाथीसुध्दा अगदी त्याच प्रेरणेने भारलेले असल्यामूळे अगदी आदर्श जोडी असा नावलौकिक चौघांनी मिळवला आणि आता तिसरी पिढी पण मिळवेल असा विश्वास आहे.

              अशा या डॉक्टर लोकांना खाजगी आयुष्य नसावे का? फक्त शासकीय आणि निमशासकीय डॉक्टरांचे प्रश्न तर आणखीन वेगळे. उमेदीची वर्षे, अभ्यास, ताण आणि रुग्ण यांच्यातच जातात त्यामूळे त्यांचे कौटूंबिक आयुष्य उशीरा सूरू होते. पुढील अनेक वर्ष त्यांची कष्टमय जातात. शासन खर्च करते त्याप्रमाणात आणि आवश्यक असणा-या लोकसंख्येच्या प्रमाणात कमी डॉक्टर तयार होतात म्हणून दिवसेंदिवस समस्या वाढत आहेत. परदेशातील डॉक्टरांचे प्रमाण आणि आपले प्रमाण व्यस्त आहे.

             शिक्षण व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था सुधारल्याशिवाय लोकांचा सर्वांगीण विकास कसा होणार? औषधे, गोळ्या, उपचार एवढे महाग असल्यामूळे शक्यतो लोक डॉक्टरांकडे जाणे टाळतात आणि शेवटच्या क्षणी जावून कधी कधी डॉक्टर हतबल होतात. परकीय कंपन्यांची मक्तेदारी, देशी उपायांची वानवा (आयुर्वेद, होमियोपथी, निसर्गौपचार) आणि आरोग्यविषयक अज्ञान यामूळे शारिरीक आणि मानसिक प्रगती म्हणावी तशी होत नाही. एकवेळ अशी येते गरीब लोक पैसे नाहीत म्ह्णुन आजारावर उपचार घेत नाही. प्रत्येकाने स्वत:ची काळजी स्वत: घेणे आणि योग्य वेळी डॉक्टरी उपाय करून घेणे हे महत्वाचे. त्यासाठी समूपदेशन, उपचाराचे महत्व, औषधांची गरज, औषधे स्वस्त दरात उपलब्ध होणे अशा अनेक गोष्टी अजून तेवढ्या प्रगत झालेल्या नाहीत.

            खाजगी, धर्मादाय, शासकीय आणि निमशासकीय अशा चार स्तरांवर वैद्यकीय व्यवस्था चालविली पाहिजे. त्यात आयुर्वेदिक,होमिओपथिक,निसर्गोउपचार या चौघांमध्ये समतोल साधला गेला पाहिजे. पर्यायी व्यवस्था स्विकारण्याचा अधिकार रुग्ण व डॉक्टर यांना असावा. डॉक्टरावरचा ताण कमी कसा करता येईल याचाही विचार झाला पाहिजे. रुग्णांचा इतिहास ठेवणारी एक यंत्रणा तयार केली पाहिजे. पॅरामेडीकल स्टाफ, नर्स, प्रयोगशाळा, अत्याधुनिक उपकरणे आणि स्वदेशी उपचार यांचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर दिला पाहिजे.स्वस्त आणि चांगले उपचार कसा देता येईल यावर जास्त भर दिला पाहीजे.

                    करोना काळातील परिस्थिती लक्षात घेता एकदमच घाबरून न जाता शांतपणे आल्या प्रसंगाला तोंड दिल्यास आपल्याला झालेला रोग आणि उपचार यांच्यावर विश्वास ठेवणे शक्य होईल. डॉक्टर हाही शेवटी एक “माणुस”आहे हे मान्य करून जे झाले ते स्विकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. डॉक्टरनेसुद्धा आपल्या कर्तव्यात न चुकता रुग्णांच्या हितकारक निर्णय घेऊन व्याधीमुक्त करण्याचे कर्त्यव्यपालन इमाने इतबारे करावे. काही अपवाद असतात म्हणून सगळ्यांना बदनाम करून इतरांवर अन्याय करू नये असे वाटते. अशा या धन्वतरीच्या शिष्याला शतश: प्रणाम!

Comments

  1. अतिशय अभ्यासपूर्ण व सद्य:स्थितीवर आधारित लेख 👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव